अखेर डिजेच्या तालावर नाचणारा सहायक अभियंता निलंबित

वरिष्ठांचे आदेश डावलून मंत्रालयात बसून बदली रद्द करून आणल्याच्या आनंदात महावितरण कंपनीच्या सहाय्यक अभियंत्याने वाजत गाजत मिरवणूक काढली. ही मिरवणूक या अभियंत्याच्या चांगलीच अंगलट आली आहे. विनापरवाना मिरवणूक ,वाहतुकीस अडथळा, याबाबत पोलीस ठाण्यात गुन्हा करण्यात आला असून त्यासोबत उर्मटपणा, उद्धटपणा, असभ्यवर्तन अशी विविध आरोप लावून वरिष्ठांनी निलंबितही केले आहे.

प्रकाश सकरू चव्हाण हे सहाय्यक अभियंता 16 जुलै 2019 पासून ग्रामीण उपविभाग जालना अंतर्गत शाखा क्रमांक तीन येथे कार्यरत होते. त्यांची 14 जुलै 2023 रोजी रत्नागिरी परिमंडळात बदली करण्यात आली.

त्यानंतर ते ही बदली आदेश रद्द करण्यात यशस्वी झाले आणि छत्रपती संभाजीनगर परिमंडल कार्यालयाच्या आदेशान्वये त्यांची 18 ऑगस्ट 2023 रोजी जालना येथील ग्रामीण शाखा क्रमांक 3 येथे पदस्थापना करण्यात आली. ही बदली रद्द करण्याचा आनंदोत्सव साजरा करण्यासाठी त्यांनी 21 ऑगस्ट रोजी राजुर चौफुली ते महावितरण मंडळ कार्यालय व त्यानंतर महावितरण विभाग क्रमांक 1 जालनापर्यंत वाजत गाजत मिरवणूक काढण्यात आली.

या मिरवणुकीचे अनेक वृत्तपत्रांमध्ये वृत्त छापून आले तसेच इलेक्ट्रॉनिक मीडियात देखील याचे चित्रीकरण प्रदर्शित झाले. त्यामुळे महावितरणला जनसामान्यांच्या टीकेला सामोरे जावे लागले होते. याची दखल घेत विभाग क्रमांक 1 चे कार्यकारी अभियंता यांनी गोपनीय पत्रानुसार वरिष्ठांना हा सर्व प्रकार कळवला होता. त्याच दरम्यान 23 ऑगस्ट रोजी सहायक अभियंता प्रकाश चव्हाण यांच्या विरुद्ध सदर बाजार पोलीस ठाण्यामध्ये गुन्हाही नोंदविण्यात आला होता. त्यानंतर ही मिरवणूक आणि अभियंता दोघेही चर्चेत आले होते. परिणामी अभियंत्याच्या गैरप्रकारामुळे महावितरणला चांगलाच मनस्ताप सहन करावा लागला, आणि 23 ऑगस्ट रोजी महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनीचे अधीक्षक अभियंता तथा सक्षम अधिकारी संजय प्रभाकर सरग यांनी सहाय्यक अभियंता प्रकाश चव्हाण यांच्या निलंबनाचे आदेश जारी केले आहेत.

दरम्यान महावितरणने सहायक अभियंता प्रकाश चव्हाण यांना महावितरणने निलंबन करुन चांगलाच झटका दिला आहे.