योगी आदित्यनाथ यांच्या डुप्लीकेटचा संशयास्पद मृत्यू, समाजवादी पार्टीचा करायचे प्रचार

उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्यासारख्या दिसणाऱ्या सुरेश ठाकूर यांचा संशयास्पद मृत्यू झाला आहे. ते उन्नाव जिल्ह्यातील सोहरामऊ पोलीस स्थानकांतर्गत येणाऱ्या चौपई गावचे रहिवासी होते. गुरुवारी सायंकाळी त्यांना गंभीर स्थितीत जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. अतिदक्षता विभागामध्ये त्यांच्यावर उपचार सुरू होते, मात्र यादरम्यान त्यांचा मृत्यू झाला.

सुरेश यांच्या पत्नीने त्यांना बेदम मारहाण करण्यात आल्याचा आरोप केला आहे. 27 जुलै रोजी गावात बनणाऱ्या एका चौकीचा व्हिडीओ काढल्यामुळे त्यांच्यासोबत गावातीलच लोकांनी हुज्जत घातली होती. त्यानंतर दुसऱ्या दिवशी दुचाकीवरून घरी येत असताना काही जणांनी घेरून त्यांना मारहाण केली. तेव्हापासून त्यांच्यावर उपचार सुरू होते.

10 ऑगस्ट रोजी सायंकाळी त्यांना श्वास घेण्यास त्रास झाला. त्यानंतर उलट्याही झाल्या आणि त्यांची तब्येत आणखी बिघडली. त्यामुळे त्यांना जिल्हा रुग्णालयातील अतिदक्षता विभागामध्ये दाखल करण्यात आले, मात्र डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले.

दरम्यान, पतीला झालेल्या मारहाणीची तक्रार देण्यासाठी गेल्यावर पोलिसांनी आपल्यावर सेटलमेंटसाठी दबाव टाकला होता, असा आरोप सुरेश यांच्या पत्नीने केला. मात्र पोलिसांनी हा आरोप फेटाळून लावला असून सुरेश यांना मारहाण झाली नव्हती असे पोलीस अधिकारी अवधेश सिंह यांनी सांगितले.

कोण होते सुरेश ठाकूर?

सुरेश ठाकूर लखनौच्या आंबेडकर पार्कात प्लांट ऑपरेटर म्हणून काम करत होते. कर्मचाऱ्यांच्या मागण्यांसाठी त्यांनी आंदोलनही केले होते. यामुळे नाराज अधिकाऱ्यांनी त्यांना कामावरून काढून टाकले होते. गेल्या निवडणुकीमध्ये ते योगी आदित्यनाथ यांचे डुप्लीकेट म्हणून चर्चेत आले होते. समाजवादी पार्टीचा प्रचारही ते करायचे. माजी मुख्यमंत्री अखिलेश यादव यांच्यासोबतचे त्यांचे फोटोही व्हायरल झाले होते.

अखिलेश यादव यांचे ट्विट

दरम्यान, अखिलेश यादव यांनीही ट्विट करून समाजवादी पार्टीचे स्टार प्रचार म्हणून ओळख बनवणाऱ्या सुरेश ठाकूर यांच्या हत्येची घटना निंदणीय असल्याचे म्हटले आहे. सरकारने लवकरात लवकर दोषींवर कारवाई करावी, अशी मागणीही त्यांनी केली.

ताजा खबरें