जळगाव जिल्ह्यामधील भडगाव तालुक्यातील गोंड गाव येथे एका आठ वर्षीय मुलीवर अत्याचार करुन तिची हत्या करण्यात आल्याची घटना नुकतीच घडली होती.
या घटनेनंतर भाजप प्रदेश महिला मोर्चाच्या अध्यक्ष चित्रा वाघ यांनी पीडित मुलीच्या परिवाराची आज सांत्वनपर भेट घेतली. त्यांची सहानुभूतीपूर्वक चौकशी करुन मुलीच्या आरोपीस कठोर शिक्षा केली जाईल, कोणत्याही परिस्थितीमध्ये त्याला सोडले जाणार नाही, असं आश्वासन त्यांनी दिलं. यावेळी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि चंद्रशेखर बावनकुळे यांनी पीडित परिवारासाठी दिलेली आर्थिक मदत परिवाराच्या स्वाधीन केली.
जळगावमध्ये झालेल्या आठ वर्षीय मुलीवर अत्याचाराच्या प्रकरणावर चित्रा वाघ म्हणाल्या की, ‘एक आई म्हणून मला विचाराल तर मी नक्की हे सांगेन की, अशा नराधमांना भर चौकामध्ये फाशी द्यायला पाहिजे. मुलीवर अत्याचार करुन तिची हत्या करणाऱ्या या नराधमाला भर चौकात फाशी शिक्षा द्यायला पाहिजे, असे कृत्य त्याने केले आहे. मात्र कायद्याच्या चौकटीत राहून त्याला फाशीची शिक्षा मिळेल, असा विश्वास भाजप महिला प्रदेश अध्यक्ष चित्रा वाघ यांनी व्यक्त केला आहे. भविष्यात अशा घटनांची पुनरावृत्ती टाळायची असेल तर शासन, पोलीस यंत्रणेसोबत समाजानेही सजग राहण्याची आवश्यकता असल्याचं चित्रा वाघ यांनी म्हटल आहे.
पुढे चित्रा वाघ म्हणाल्या की, समाजामध्ये अशा विकृती ठेचण्यासाठी आपण समाज म्हणून सगळ्यांनी एकत्र येणं गरजेचं आहे. ती फक्त या गावची मुलगी नाही किंवा त्या आई-वडिलांची मुलगी नव्हती. तर राज्याची मुलगी होती आणि अशा हजारो मुली वाचवण्यासाठी जे जे काही करता येईल, तेथे निश्चितपणे सरकार म्हणून उभे राहत आहोत. सरकार, पोलीस दक्ष असून समाज म्हणून आपण कुठे कमी पडतोय का, हे पाहणं फार गरजेचे आहे. सगळ्यांनी एकत्रित येऊन या मुलीच्या रक्षणाची जबाबदारी घेणं गरजेचं असल्याचे चित्रा वाघ म्हणाल्या.