आता लढाई आरपारची! आरक्षण न मिळाल्यास मतदानावर टाकणार बहिष्कार; मराठा समाजाचा थेट इशारा

‘आरक्षण नाही तर मतदान नाही, हीच आमची भूमिका आहे. अनेक वर्षे आम्हाला फसवले गेले. आता आम्ही फसणार नाही.’

येत्या २०२४ च्या निवडणुकीपूर्वी मराठा आरक्षण न मिळाल्यास मतदानावर बहिष्कार टाकण्यात येईल, असा इशारा सकल मराठा समाजाचे समन्वयक बाबा इंदूलकर यांनी येथे पत्रकार परिषदेत दिला.

इंदूलकर म्हणाले, ‘शासनाने आमची फसवणूक केली आहे. आधी आम्ही अडाणी होतो, आता आमचे डोळे उघडले आहेत. न्यायिक पद्धतीने आम्ही मागणी करत आहोत. शासनाने त्यांची गांभीर्याने दखल घ्यावी. मराठा समाजातील नेत्यांनी हा विषय समजून घेऊन मांडावा. अन्यथा त्यांच्याविरूद्धही आम्ही आंदोलन करू.’

भारती पोवार म्हणाल्या, ‘मराठा जातीतील नेत्यांनी अन्य समाजांचा विचार करून त्यांना न्याय दिला. आता मराठा समाजावर हलाखीची वेळ आली आहे. तरूण मराठा सैरभैर झाला असून, त्याला आरक्षणाची गरज आहे. हेतूपुरस्सर मराठा समाजाला आरक्षण दिले जात नाही.’

रूपाराणी निकम म्हणाल्या, ‘कोल्हापुरात पडलेल्या आरक्षणाच्या ठिणगीचा महाराष्ट्रात (Maharashtra) वणवा पेटल्याखेरीज राहणार नाही. आरक्षण हिसकावून घेण्याची वेळ आली आहे. जे मराठा खासदार, आमदार आरक्षणाच्या लढ्यात येणार नाहीत, त्यांचा यापुढे विचार केला जाणार नाही.’ सुनीता पाटील म्हणाल्या, ‘आरक्षण नाही तर मतदान नाही, हीच आमची भूमिका आहे. अनेक वर्षे आम्हाला फसवले गेले. आता आम्ही फसणार नाही.’

ताजा खबरें