सरकारचा नवा प्लॅन, आता इंटरनेटशिवाय मोबाईलवर टीव्ही पाहणे होणार शक्य, काय आहे D2M तंत्रज्ञान?

(डायरेक्ट-टू-मोबाइल) म्हणून ओळखले जाणारे तंत्रज्ञान मोबाइल फोन वापरकर्त्यांना त्यांच्या डिव्हाइसवर केबल किंवा DTH कनेक्शनद्वारे टीव्ही पाहण्याची परवानगी देईल, इकॉनॉमिक टाईम्सने 5 ऑगस्ट रोजी असे वृत्त दिले आहे.

सूत्रांनी सांगितले की दूरसंचार विभाग (DoT), माहिती आणि प्रसारण मंत्रालय (MIB) आणि IIT-कानपूर यावर काम करत आहेत, असे अहवालात सांगितले आहे.

टेलिकॉम ऑपरेटर कदाचित या प्रस्तावाला विरोध करतील, कारण त्यांच्या व्यवसायासाठी हे धोकादायक आहे. तसेच यामुळे 5G व्यवसायाचे मोठे नुकसान होईल, असे अहवालात नमूद केले आहे.

“आम्ही व्यवहार्यता तपासत आहोत आणि दूरसंचार ऑपरेटर्ससह सर्व भागधारकांची बैठक घेतल्यानंतर अंतिम निर्णय घेतला जाईल,” असे एका अधिकाऱ्याने नाव न सांगता इकॉनॉमिक टाईम्सला सांगितले.

अहवालानुसार, DoT, MIB, IIT-कानपूरचे अधिकारी तसेच दूरसंचार आणि प्रसारण उद्योगांचे प्रतिनिधी पुढील आठवड्यात बैठकीला उपस्थित राहतील अशी अपेक्षा आहे.

डी टू एम तंत्रज्ञान काय आहे?

डायरेक्ट टू मोबाईल म्हणजेच D2M तंत्रज्ञानावर काम अजूनही सुरू आहे. आणि ते लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी वेळ लागेल. हे नवीन तंत्रज्ञान एफएम रेडिओसारखेच कार्य करते.

OTT प्लॅटफॉर्म मोबाइल फोनसाठी मल्टीमीडिया कंटेंट प्रदान करण्यासाठी या D2M तंत्रज्ञानाचा वापर करू शकतात. प्रसार भारती सध्या टीव्ही प्रसारणासाठी 526-582 मेगाहर्ट्झ बँड वापरते. हा बँड मोबाईल आणि ब्रॉडकास्ट अशा दोन्ही सेवांसाठी काम करेल.

या तंत्रज्ञानाच्या मदतीने, स्मार्टफोन वापरकर्ते त्यांचा मोबाईल  डेटा न वापरता ओटीटी प्लॅटफॉर्मवर मल्टीमीडिया कंटेंट पाहू शकतील. यामुळे ग्राहकांचा मोबाईल डेटावरील खर्च कमी होईल.

यासोबतच ग्रामीण भागात राहणा-या लोकांनाही मदत केली जाईल, जिथे सामान्यत: इंटरनेटच्या उपलब्धतेमध्ये समस्या आहे. ज्या भागात इंटरनेटचा वापर मर्यादित किंवा अत्यंत कमी आहे, तेथे या नवीन तंत्रज्ञानाच्या मदतीने लोक व्हिडिओ सामग्री पाहू शकतील.

याशिवाय D2M तंत्रज्ञानाच्या मदतीने ग्रामीण भागात राहणाऱ्या विद्यार्थ्यांनाही त्यांच्या अभ्यासात मदत होणार आहे. हे तंत्रज्ञान आल्यानंतर शेतकऱ्यांना इंटरनेटशिवाय हवामानाचा अंदाज आणि विविध कृषी पद्धतींची माहिती मिळू शकणार आहे.

ताजा खबरें