समाजकल्याणमंत्री सुभाष फळदेसाई यांची ग्वाही : गृह आधार, विधवासहाय्य मिळून रु. चार हजार
पणजी – विधवा महिलांसाठी असलेली आर्थिक मदत ऊ. 2500 आणि गृह आधाराची ऊ. 1500 अशी एकूण 4000 ऊ.ची मदत मिळाली पाहिजे, असा दावा समाज कल्याणमंत्री सुभाष फळदेसाई यांनी काल मंगळवारी विधानसभेत केला. वित्त खात्याने त्यासाठी संमती द्यावी, अशी विनंती त्यांनी मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांना केली. सावंत यांनी ती देण्याची तयारी दर्शवली. त्यामुळे गृह आधाराची लाभार्थी असलेल्या महिलेच्या पतीचे निधन झाल्यास तिला दोन्ही योजनांचे लाभ मिळतील, अशी ग्वाही फळदेसाई यांनी दिली. आमदार गणेश गांवकर यांनी या संदर्भात प्रश्न उपस्थित केला होता.
विधवांना मदत करा : गावकर
गृह आधाराची लाभार्थी असलेल्या महिलेच्या पतीचे निधन झाल्यानंतर तिला विधवांसाठी असलेली मदत हवी असेल तर तिची गृहआधार योजना बंद केली जाते. विधवांसाठीची मदत मिळेपर्यंत अनेक महिने जातात. प्रत्यक्षात तिला काहीच मदत मिळत नाही आणि तिचे हाल होतात, अशी तक्रार गांवकर यांनी केली. तिचे हाल थांबावेत आणि आर्थिक मदत बंद न होता चालू रहावी, यासाठी काहीतरी करा, अशी मागणी गांवकर यांनी केली.
मुख्यमंत्र्यांनी दिले आश्वासन
अशा प्रकारचा दुहेरी लाभ दिल्यास अतिरिक्त खर्च वाढणार म्हणून वित्त खात्याने प्रश्न उपस्थित केल्याची माहिती फळदेसाई यांनी दिली. मुख्यमंत्र्यांनी तो प्रश्न निकालात काढण्याचे आश्वासन यावेळी दिले. त्यामुळे यापुढे अशा महिलांना दोन्ही योजनांचे लाभ मिळू शकतील, असे फळदेसाई यांनी स्पष्ट केले.
तीन महिन्यांत मिळणार लाभ
फळदेसाई यांनी सांगितले की, विधवा महिलेचे शेवटचे अपत्य 18 वर्षाखालील असल्यास तिला दोन्ही योजनांचा लाभ मिळू शकतो. त्यासाठी तिला विधवा मदत योजनेचा अर्ज भऊन द्यावा लागणार आहे. पुढील 3 महिन्यात विधवा महिलांना दोन्ही योजनांचा लाभ मिळवून देण्यासाठी प्रयत्न करण्याचे आश्वासन फळदेसाई यांनी दिले. अशा प्रकारे दोन्ही योजनांचा लाभ मिळणाऱ्या विधवा महिलांची संख्या अंदाजे 10 हजार असू शकते. त्याकरीता योजनेचा खर्च वाढणार असून त्याची तरतूद करण्याची गरज आहे. वित्त खात्याने ती केल्यानंतर विधवा महिलांना दोन्ही योजनांची मदत मिळू शकते आणि त्यांना आर्थिक लाभ घेता येईल, असे ते म्हणाले.