मुंबईत मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या ताफ्यात कार घुसली, पोलिसांकडून चालकाला बेड्या

महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे  यांच्या ताफ्यात घुसलेल्या एका कार चालकाला पोलिसांनी अटक केली आहे. मुंबईतील वांद्रे पोलीस स्टेशनमध्ये कार चालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला.

मात्र त्याला कोर्टाकडून जामीन (Bail) मिळाल्याची माहिती पोलिसांनी दिली.

27 जुलै रोजी मुख्यमंत्र्यांच्या ताफ्यात गाडी घुसवण्याचा प्रयत्न

मुख्यमंत्र्यांच्या ताफ्यात कार घुसवण्याच्या आरोपात वांद्रे पोलिसांनी कार चालकाला अटक केली होती. गंगू रझाक असं या चालकाचं नाव आहे. 27 जुलै रोजी त्याने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या ताफ्यात आपली कार घुसवली होती. गंगू रझाक विरोधात आयपीसीच्या कलम 188,279 आणि 336 अंतर्गत गुन्हा दाखल करुन त्याला बेड्या ठोकल्या होत्या.

कार चालक म्हणाला…

पोलिसांनी कार चालक गंगू रझाकची चौकशी केली असता त्याने सांगितलं की, ताफ्याच्या मागे जाण्याचा त्याचा कोणताही इरादा नव्हता. तो काही कामानिमित्त जात होत आणि गाडी ताफ्याच्या अगदी मागे ठेवली.व्हीआयपी ताफ्याच्या मागे गाडी ठेवल्यावर कोणती कारवाई होईल याबाबत आपल्याला कोणतीच कल्पना नव्हती.

चालकाला कोर्टाकडून जामीन मंजूर

दरम्यान संबंधित कार चालक गंगू रझाकला कोर्टात हजर केलं असता त्याला जामीन मंजूर झाल्याची माहिती वांद्रे पोलिसांनी दिली