“माझा पेपर, मीच संपादक, माझाच मुलाखतकार,माझीच मुलाखत… भन्नाट!”

मुंबई – खासदार संजय राऊतांनी घेतलेल्या मुलाखतीचा एक भाग आज दि. २६ जुलै रोजी प्रसिद्ध करम्यात आला. यावेळी ठाकरेंनी सरकारवर टीका केली. त्यांच्या या टीकेला आता मुलाखतीवर भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी ट्विट करत निशाणा साधला आहे.

उद्धव ठाकरेंनी बाळासाहेबांच्या हिंदुत्ववादी विचारांची ज्वलंत मशाल मिठी नदीत विझवली. उद्धव ठाकरेंच्या तोंडून लोकशाही वाचवण्याच्या गप्पा ऐकणं म्हणजे विनोद. असे म्हणतं बावनकुळेंनी निशाणा साधला आहे.

ट्विट करत चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले, “\मी, माझा पेपर, स्वकियांशी माझा झालेला सामना, मीच संपादक, माझाच मुलाखतकार,माझीच मुलाखत… भन्नाट! हिंदूह्रदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या हिंदुत्ववादी विचारांची ज्वलंत मशाल कलानगर शेजारील मिठी नदीत विझवून सोनिया गांधींच्या सेनेसमोर मुजरा करणारे उद्धव ठाकरे आज पंतप्रधान नरेंद्र मोदीजींवर टीका करत आहेत. मोदीजी आणि अमित भाईंच्या नेतृत्वात देश सुरक्षित आहे. उद्धव ठाकरे तुम्हाला तुमच्या आमदारांचं नेतृत्व करता आलं नाही. ते तुमच्या नाकर्तेपणामुळे नाकाखालून निघून गेले. मुख्यमंत्री असताना तुम्ही मातोश्री बाहेर पडले नाहीत आणि आता लोकांना दोष देत आहात.”

“कुटनीतीला कुटण्याची भाषा तुम्हाला शोभत नाही. कारण २०१९ साली युतीत निवडणूक लढून तुम्ही महागद्दारी केली आणि महाविकास आघाडी सरकार स्थापन केलं. तेव्हांच तुम्ही नितीमत्ता पायाखाली तुडवली होती. त्यामुळे घरात बसून निती-अनितीच्या गप्पा तुम्ही मारु नका. घराणेशाही टिकवण्यासाठी एकत्र आलेल्या ‘इस्ट इंडिया’ कंपनीचं कडबोळं आता लोकशाही टिकवण्याच्या गप्पा मारत आहेत. मी, माझं कुटुंब आणि माझा मुलगा एवढाच विचार करणाऱ्या उद्धव ठाकरेंच्या तोंडून लोकशाही वाचवण्याच्या गप्पा ऐकणं म्हणजे मोठा विनोदच आहे.”असं म्हणत बावनकुळे यांनी ठाकरेंना प्रत्त्युत्तर दिलं आहे.