सचिन तेंडुलकरच्या ‘त्या’ जाहिरातीवर तात्काळ बंदी घाला, बच्चू कडूंचं आवाहन

सचिन तेंडुलकर हे भारतरत्न आहेत. असंख्य चाहते व भारतरत्न असणाऱ्या व्यक्तीने पेटीएम फर्स्ट सारख्या जुगार चालवणाऱ्या गेम्स ॲपची जाहीरात करणं योग्य नाही. माझी महाराष्ट्र शासन आणि सचिन तेंडुलकर यांना विनंती आहे की या जाहिरातीवर तात्काळ बंदी घालावी, असं आवाहन बच्चू कडू यांनी केलं आहे.

बच्चू कडू यांनी ट्विटर अकाऊंटवरुन एक व्हिडिओ शेअर केला आहे. त्यामध्ये ते म्हणतात, सचिन तेंडुलकर यांच्या पेटीएम फर्स्ट जाहिरातीसंदर्भात माझ्याकडे प्रितेश पवार यांची तक्रार आली आहे. सचिन तेंडुलकर हे प्रसिद्ध क्रिकेटर असून भारतात त्यांचा मोठा चाहता वर्ग आहे. ते करत असलेल्या जाहिरातींचा परिणाम लहान मुलांपासून ते थोरांपर्यंत होतो. ते करत असलेली पेटीएम फर्स्टची जाहिरात जुगाराला प्रोत्साहन देणारी आहे. या जुगाराच्या जाहिरातीला महाराष्ट्रातील जनता बळी पडत आहे. त्यामुळे तेंडुलकर यांनी जुगाराला प्रोत्साहन देणाऱ्या गेम्सची जाहिरात करु नये, असं आवाहन कडू यांनी केलं असून, त्यासाठी त्यांना खुलं पत्रही लिहिलं आहे.