देशातील नेत्यांना ‘अशिक्षित’ म्हणणं काजोलला पडलं महागात; अखेर द्यावं लागलं स्पष्टीकरण

मुंबई – अभिनेत्री काजोल सध्या तिच्या आगामी ‘द ट्रायल : प्यार, कानून, धोखा’ या पहिल्यावहिल्या वेब सीरिजचं जोरदार प्रमोशन करतेय. येत्या 14 जुलै रोजी ही सीरिज डिस्ने प्लस हॉटस्टारवर प्रदर्शित होणार आहे.

मात्र या सीरिजच्या प्रमोशननिमित्त नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत काजोलने राजकारण्यांविषयी केलेल्या एका वक्तव्याची जोरदार चर्चा होत आहे. कोणतीही शैक्षणिक पार्श्वभूमी नसलेले राजकीय नेते भारतात राज्य करत आहेत, असं ती म्हणाली. तिच्या याच वक्तव्यावर नेटकरी भडकले आणि तिला ट्रोल करण्यास सुरुवात केली. फक्त नेटकरीच नाहीत तर राजकीय क्षेत्रातील काही नेत्यांनीही तिच्यावर ताशेरे ओढले. या ट्रोलिंगनंतर अखेर काजोलने ट्विट करत तिच्या वक्तव्याविषयी स्पष्टीकरण दिलं आहे.

नेमकं काय म्हणाली काजोल?

‘द क्विंट’ला दिलेल्या मुलाखतीत महिला सशक्तीकरण या विषयावर चर्चा करताना काजोल म्हणाली, ‘बदल हा विशेषत: भारतासारख्या देशात फार मंद गतीने होत आहे. हा बदल अत्यंत संथ गतीने होत आहे. कारण आपण आपल्या परंपरांमध्ये अडकलो आहोत आणि आपल्या विचारप्रक्रियेत अडकलो आहोत. अर्थातच या सर्व गोष्टींचा संबंध शिक्षणाशी आहे. आपल्याकडे असे राजकीय नेते आहेत ज्यांना शैक्षणिक व्यवस्थेची पार्श्वभूमी नाही. मला माफ करा पण मी बाहेर जाऊन हेच सांगणार आहे. माझ्यावर नेत्यांचं राज्य आहे, त्यांच्यापैकी अनेकांचा तो दृष्टीकोन नाही. जो माझ्या मते शिक्षण तुम्हाला किमान वेगळा दृष्टीकोन शोधण्याची संधी देतो.’

काजोलच्या मुलाखतीचा हा व्हिडीओ व्हायरल होताच नेटकऱ्यांनी तिला जोरदार ट्रोल करण्यास सुरुवात केली. ‘घराणेशाहीमुळे वर आलेली काजोल स्वत: शाळा सोडलेली निरक्षर आहे. तिचा पती कॅन्सर (गुटख्याची जाहिराती) विकतो आणि आता तिचा आत्मविश्वास बघा’, असं एकाने लिहिलं. तर ‘काजोलने शाळा सोडली होती आणि अजय देवगण गुटख्याची जाहिरात करतो. याच गोष्टींनी तिला अशी टिप्पणी करण्यापासून थांबवलं नाही’, असं दुसऱ्या युजरने म्हटलंय.

अखेर शनिवारी काजोलने ट्विट करत याप्रकरणी स्पष्टीकरण दिलं. ‘मी फक्त शिक्षण आणि त्याच्या महत्त्वाबद्दल माझा मुद्दा मांडत होते. माझा हेतून कोणत्याही राजकीय नेत्याची बदनामी करण्याचा नव्हता. आपल्याकडे काही महान नेते आहेत जे देशाला योग्य मार्गावर मार्गदर्शन करत आहेत’, असं तिने लिहिलं.