अमळनेरच्या माजी आमदाराचा प्रताप, अनिल भाईदास पाटील यांच्यावर जनतेचा रोष

अमळनेर – राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात बंड करून अजित पवार यांच्या गोटात सामील झालेले आमदार अनिल पाटील यांना अचानक कॅबिनेट मंत्रिपदाची लॉटरी लागली. तसे त्यांनी बोलूनही दाखविले. त्यांच्या स्वागतासाठी अमळनेरात मात्र चक्क निष्पाप शालेय विद्यार्थ्यांचा वापर झाल्याने जनतेत संताप व्यक्त केला जात आहे. चक्क रस्त्याच्या दुतर्फा भर उन्हात विद्यार्थ्यांना रांगेने सुमारे एक तास बसविण्यात आले असल्याने आता अनिल पाटील यांच्यावर रोष व्यक्त होत आहे.

मंत्रिपदाची शपथ घेतल्यानंतर कॅबिनेट मंत्री अनिल पाटील पहिल्यांदा अमळनेर मतदारसंघात (एम एच १९ एम ७१७१) या शासकीय वाहनाने दाखल झाले, यावेळी त्यांच्या स्वागतासाठी आश्रमशाळेच्या विद्यार्थ्यांना धरणगाव- अमळनेर रस्त्यावर टाकरखेडा परिसरात दुतर्फा बसवण्यात आले होते. हे विद्यार्थी अमळनेर येथील एस. एस. पाटील आश्रमशाळेचे होते. हे – विद्यार्थी मंत्र्यांची वाट पाहत रस्त्यावरच उन्हात बसले होते. एखाद्या वाहनाने जर धडक दिली असती तर विद्यार्थ्यांचा अपघातही होऊ शकला असता अशी परिस्थिती होती.

मंत्री अनिल पाटील यांच्या वाहनात त्यांची पत्नी व आई देखील होती, अशी माहिती मिळाली. तसेच वाहनातून उतरल्यावर माजी आ. बी. एस. पाटील यांचे पाया पडून मंत्री अनिल पाटील यांनी आशीर्वाद घेतले. रोटरी क्लबच्या वतीने मंत्र्यांच्या स्वागताच्या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं. ही आश्रमशाळा भाजपचे माजी आमदार बी. एस. पाटील यांची शैक्षणिक संस्था असल्याची माहिती मिळत आहे.विद्यार्थ्यांना मंत्र्यांच्या स्वागतासाठी रस्त्यावर बसवण्यात आल्याने नाराजी व्यक्त केली जात आहे. हि बाब चुकीची असून नागरिकांमधून संताप व्यक्त केला जात आहे.

तसेच, या प्रकाराबाबत मंत्री अनिल पाटील यांनी कुठलाच संताप व्यक्त न करता हात जोडून स्वागत स्वीकारले. त्यामुळे अनिल पाटील यांच्या कृत्याबद्दल नागरिकांमध्ये आणखीनच रोष वाढला आहे.

jalgaonsandesh

jalgaonsandesh