उद्धव ठाकरेंना अजुन एक मोठा धक्का ; निलम गोर्‍हेचा शिवसेनेत प्रवेश

मुंबई – गेल्या काही दिवसांपासून शिवसेनेतील आमदार नाराज असल्याच्या अफवा पसरत आहेत. मात्र या सगळ्या अफवांचा बुरखा फाडणारी घटना घटना आज घडणार आहे. ठाकरे गटाच्या उपनेत्या, विधानपरिषदेच्या उपसभापती, माध्यमांसमोर ठाकरे गटाची बाजू मांडण्यासाठी प्रसिद्ध असलेल्या आणि उद्धव ठाकरेंच्या अत्यंत विश्वासू नीलम गोर्‍हे आज दुपारीच मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या नेतृत्वाखालील शिवसेनेत प्रवेश करणार आहेत. त्यांच्यासह दोन मोठे पदाधिकारी आणि कार्यकर्तेही शिवसेनेत सामिल होणार आहेत. यामुळे ठाकरे गटाला लागलेली गळती कायम असल्याचे चित्र पुन्हा वर आले आहे.

नीलम गोर्‍हे या ठाकरे गटाच्या धडाडीच्या कार्यकर्त्या मानल्या जात होत्या. शिवसेनेच्या वर्धापनदिनादिवशी देखील ठाकरेंच्या मेळाव्यात त्यांचा सहभाग होता. मात्र गेले काही दिवस ठाकरे गटाचे अनेक नेते पक्षामध्ये मनासारखं काम करायला मिळत नसल्याची तक्रार करत आहेत. या नाराजीतूनच मनिषा कायंदे, राहुल कनाल यांसारख्या मोठमोठ्या नेत्यांनी उद्धव ठाकरेंची साथ सोडली आहे. त्यात आता नीलम गोऱ्हेंसह ठाकरे गटातील आणखी दोन पदाधिकारी शिवसेनेत प्रवेश करणार असल्याने ठाकरे गटाच्या चिंतेत भर पडली आहे.

नागपूर अधिवेशनापासूनच झाली होती सुरुवात

नागपूर अधिवेशनादरम्यान उद्धव ठाकरे नागपुरात दाखल होताच, काही आमदारांनी नीलम गोऱ्हे यांची तक्रार केली होती. नीलम गोऱ्हे या उपसभापती असूनही आपल्याला बोलू देत नाहीत. आदित्य ठाकरेंच्या मुद्द्यावर ज्यावेळी अधिवेशनात सत्ताधाऱ्यांनी उद्धव ठाकरे गटाला घेरलं होतं. त्यावेळी उपसभापती म्हणून नीलम गोऱ्हे यांनी आपल्या आमदारांना बोलू द्यायला हवं होतं, असं आमदारांचं म्हणणं होतं. त्यावेळी उद्धव ठाकरेंनीही नीलम गोऱ्हेंना खडे बोल सुनावले होते, अशी माहितीही समोर आली होती.

त्यानंतर नीलम गोऱ्हेंचा एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेकडे ओढा वाढत गेला. मुख्यमंत्र्यांसोबतच्या कार्यक्रमांना त्या प्रोटोकॉल म्हणून उपस्थित असायच्या. तसेच, काही दिवसांपूर्वी मुख्यमंत्र्यांनी नीलम गोऱ्हेंच्या पुण्याच्या घरी जाऊन त्यांची भेट घेतली होती. तेव्हापासूनच नीलम गोऱ्हे शिंदे गटात जाणार असल्याच्या चर्चा रंगल्या होत्या. आज अखेर दुपारी नीलम गोऱ्हे शिवसेनेत प्रवेश करणार आहेत. तसेच, नीलम गोऱ्हेंसह ठाकरे गटातील आणखी दोन पदाधिकारी शिवसेनेत प्रवेश करणार आहेत.

ठाकरेंचं विधानसभा, विधानपरिषदेतील संख्याबळ कमकुवत

ठाकरे गटाचे विधानपरिषदेत ११ आमदार आहेत. त्यापैकी विप्लव बाजोरिया हे आधीच एकनाथ शिंदेंसोबत गेले आहेत. काही दिवसांपूर्वी मनिषा कायंदेही ठाकरेंची साथ सोडून शिंदेंकडे गेल्या आहेत. विधानसभेचे ४० आमदार आधीपासूनच एकनाथ शिंदेंकडे आहेतच, आता विधानपरिषदेचेही ३ आमदार शिंदेंकडे गेले आहेत. त्यामुळे आता विधानपरिषदेतील शिवसेनेचं ठाकरे गटाचं जे संख्याबळ आहे, हे ११ वरुन कमी झाल्याचं पाहायला मिळत आहे.

jalgaonsandesh

jalgaonsandesh