उद्यापासुन नरेंद्र मोदी चार राज्यांच्या दौऱ्यावर!

आणखी दोन वंदे भारत रेल्वे सुरू होणार

नवी दिल्ली – विधानसभा निवडणूक तोंडावर असलेल्या राजस्थान, छत्तीसगड, तेलंगणा या राज्यांसोबतच उत्तर प्रदेशात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा सात आणि आठ जुलै रोजी दोन दिवसांचा दौरा आहे. यादरम्यान चार राज्यांमध्ये ५० हजार कोटी रुपयांच्या प्रकल्पांचे लोकार्पण आणि पायाभरणी पंतप्रधानांच्या हस्ते होईल. यामध्ये छत्तीसगड व उत्तर प्रदेशचा दौरा सात जुलैला तर तेलंगण व राजस्थानचा दौरा आठ जुलै रोजी होणार आहे.

७ जुलै रोजी, सकाळी १०:४५ वाजता, पंतप्रधान रायपूरमध्ये एका सार्वजनिक कार्यक्रमात पायाभरणी करतील आणि विविध विकास प्रकल्प राष्ट्राला समर्पित करतील. पंतप्रधान गोरखपूर, उत्तर प्रदेश येथे दुपारी २:३० वाजता पोहोचतील, जेथे ते गीता प्रेस गोरखपूरच्या शताब्दी सोहळ्याच्या समारोप समारंभात सहभागी होतील, त्यानंतर गोरखपूर रेल्वे स्थानकावर वंदे भारत गाड्यांना हिरवा झेंडा दाखवून रवाना होतील. त्यानंतर, संध्याकाळी ५ वाजता, पंतप्रधान वाराणसीला पोहोचतील, जिथे ते एका सार्वजनिक कार्यक्रमाला उपस्थित राहतील, जिथे ते राष्ट्राला अनेक विकास प्रकल्पांची पायाभरणी, उद्घाटन आणि समर्पित करतील.

८ जुलै रोजी, सकाळी १०:४५ वाजता, पंतप्रधान वारंगल, तेलंगणा येथे पोहोचतील आणि एका सार्वजनिक कार्यक्रमाला उपस्थित राहतील जेथे ते विविध प्रकल्पांची पायाभरणी करतील. पंतप्रधान दुपारी ४:१५ वाजता बिकानेरला पोहोचतील, जिथे ते राजस्थानमधील अनेक विकास प्रकल्पांची पायाभरणी करतील आणि राष्ट्राला समर्पित करतील.

छत्तीसगडच्या पायाभूत सुविधांना बळकटी देण्यासाठी रायपूरमध्ये ७ हजार ५०० कोटी रुपयांच्या प्रकल्पांना प्रारंभ होणार असून पाच राष्ट्रीय महामार्ग प्रकल्पांचे भूमीपूजन पंतप्रधान मोदी करतील. यासोबतच उत्तर प्रदेशात गोरखपूर – लखनौ आणि जोधपूर – अहमदाबाद (साबरमती) यांना जोडणाऱ्या दोन वंदे भारत रेल्वे गाड्यांना पंतप्रधान मोदी हिरवा झेंडा दाखवतील.

गोरखपूरच्या गीता प्रेसच्या शताब्दी सोहळ्यालाही पंतप्रधान मोदी हजेरी लावणार असून गोरखपूर रेल्वे स्थानकाच्या पुनर्विकासाची पायाभरणी करतील. त्यानंतर वाराणसी येथे १२१०० कोटीहून अधिक रुपयांच्या विकास कामांचे मोदी यांच्या हस्ते होईल.

गंगा काठावरील मणिकर्णिका आणि हरिश्चंद्र घाटांच्या पुनर्विकास त्याचप्रमाणे पीएम विकासनिधीचे कर्जवाटप, प्रधानमंत्री आवास योजनेच्या घरांचे लाभार्थ्यांना वाटप यासारख्या कामांचा समावेश आहे.

तेलंगणातील वारंगलमध्ये ६१०० कोटी रुपयांच्या रस्ते कामांच्या तसेच रेल्वे मार्गांच्या पायाभूत विकास प्रकल्पांची पायाभरणी पंतप्रधानांच्या हस्ते केली जाईल.

तर राजस्थानच्या बिकानेरमध्ये २४ हजार ३०० कोटी रुपयांहून अधिक खर्चाच्या विकास प्रकल्पांची पायाभरणी पंतप्रधान करतील. यात बिकानेर रेल्वे स्थानकाच्या पुनर्विकास कामासह अमृतसर – जामनगर इकॉनॉमिक कॉरिडॉरचा सहा पदरी ग्रीनफिल्ड एक्स्प्रेसवे टप्प्याच्या उद्घाटनाचाही समावेश आहे.

jalgaonsandesh

jalgaonsandesh