सुट्टे पैसे नको, QR स्कॅन करा; मुंबईतील ‘डिजिटल’ भिकाऱ्याचा व्हिडिओ होतोय व्हायरल

गेल्या काही वर्षांमध्ये देशात डिजिटल व्यवहारांचं प्रमाण भरपूर वाढलं आहे. अगदी रस्त्यावरच्या भाजी विक्रेत्यांपासून, मोठ्या कारच्या शोरूमपर्यंत सगळीकडे लोक यूपीआयच्या माध्यमातून पैसे देत आहेत.

या सगळ्यात चक्क देशातील भिकारी देखील यूपीआयच्या माध्यमातून पैसे मागताना दिसून येत आहेत.

मुंबईतील अशाच एका डिजिटल भिकाऱ्याचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. लोकलमध्ये फिरत, हातात एक बारकोड घेऊन हा व्यक्ती भीक मागताना दिसत आहे. यामुळे लोक आता ‘सुट्टे पैसे नाहीत’, असं म्हणून त्याला टाळूही शकत नाहीयेत.

रेल्वेमधील प्रवासी या भिकाऱ्याला पाहून हसत आहेत. कित्येक जण त्याला टाळत आहेत, तर काही अगदी कौतुकाने क्यूआर कोड स्कॅन करून त्याला पैसे देत आहेत.

एका ट्विटर अकाउंटवरून हा व्हिडिओ शेअर करण्यात आला आहे. जग्गीराम रणबीर असं या ट्विटर यूजरचं नाव आहे. डिजिटल इंडिया अशा हॅशटॅगसह हा व्हिडिओ शेअर होत आहे. डिजिटल पेमेंट वापरण्याची ही हाईट असल्याचं जग्गीरामने म्हटलं आहे. ही कॅशलेस सुविधा एकदम भारी असल्याचं या यूजरने म्हटलं आहे.

दरम्यान, सोशल मीडियावर याबाबत विविध प्रकारच्या प्रतिक्रिया येत आहेत. दिव्यांग नसून देखील काम करायचं सोडून भीक मागत असल्याबद्दल या भिकाऱ्यावर काही जण टीका करत आहेत. तर, त्याच्या या डिजिटल आयडियासाठी काही लोक त्याचं कौतुकही करत आहेत. याला सरकारचं यश म्हणावं की अपयश? असा प्रश्नही एका ट्विटर यूजरने उपस्थित केला आहे.

 

jalgaonsandesh

jalgaonsandesh