पाळधी येथील राहत्या घरी पालकमंत्र्यांनी केले सर्जा-राजाचे पूजन !

हेमकांत गायकवाड

धरणगाव :तालुक्यातील पाळधी येथील राहत्या घरी पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील यांनी सर्जा-राजाचे पूजन करून पोळा साजरा केला. तर जिल्हावासियांना पोळ्याच्या शुभेच्छा देतांना नियमांचे पालन करण्याचे आवाहन सुध्दा पालकमंत्र्यांनी केले आहे.

पोळा हा कृषी संस्कृतीमधील एक अविभाज्य घटक. वर्षभर आपल्या धन्याची इमाने-इतबारे सेवा करणार्‍या बैलांप्रती कृतज्ञता व्यक्त करण्याचा सण म्हणजेच पोळा होय. ग्रामीण भागात याचा उत्साह काही औरच असतो. स्वत: पाळधी सारख्या खेड्यात वास्तव्याला असणारे पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील हे दरवर्षी पोळ्या निमित्त बैलांचे पूजन करत असतात. यंदा देखील त्यांनी बैलांचे पूजन करून त्यांच्या प्रती कृतज्ञता व्यक्त केली.

पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील यांनी पोळ्यानिमित्त जिल्हावासियांना शुभेच्छा दिल्या आहेत. कोरोनाचे सावट थोडे कमी झाले असले तरी ते पूर्णपणे गेलेले नाही. यामुळे नियमांचे पालन करून पोळा साजरा करण्याचे आवाहन ना. गुलाबराव पाटील यांनी केले आहे.