कोयता हल्ल्यात तरुणीचा जीव वाचवणाऱ्या  युवकांना मुख्यमंत्र्यांच्या वतीने 15 लाख रुपयांचं बक्षीस !

पुणे – शहराच्या मध्यवस्तीत झालेल्या कोयता हल्ल्यात तरुणीचा जीव वाचवणाऱ्या लेजपाल जवळगे, हर्षद पाटील व दिनेश मडावी या जिगरबाज तरुणांना मुख्यमंत्र्यांनी प्रत्येकी पाच लाख रुपयांचे बक्षीस जाहीर केले आहे.

पुण्यातील सारसबाग जवळील शिवसेना भवनात पक्षाच्या प्रवक्त्या डॉ. ज्योती वाघमारे यांच्या हस्ते ही रक्कम या जिगरबाज तरुणांना सुपूर्द करण्यात आली आहे.

या आर्थिक मदतीतून त्यांना पुढील शैक्षणिक परिक्षा देण्यासाठी निश्चितच पाठबळ मिळेल असा संदेशही मुख्यमंत्र्यांनी या समवेत पाठवला. तसेच, पिडीत तरुणीलाही तिच्या पुढील शिक्षणासाठी पाच लाख रुपयांची मदत करण्यात आली आहे.

पिडीत तरुणीला मदत करण्यासाठी तिच्या सोबत असलेल्या तिच्या मित्रालाही पंचवीस हजाराची मदत व होणाऱ्या शस्त्रक्रियेचा संपूर्ण खर्च शिवसेनेच्या वतीने करण्यात येणार आहे.

यानंतर शिवसेनेच्या वतीने शिष्टमंडळाने पोलीस आयुक्तांची भेट घेत शहरातील महिलांच्या सुरक्षेसाठी तातडीने उपाययोजना राबवित महिला सुरक्षा धोरण ठरविण्याची मागणी करण्यात आली.

पुणे शहर शिवसेनेच्या वतीने महिलांच्या सुरक्षेसाठी लवकरच टोल फ्री क्रमांक जारी करण्यात येत असून शिवसेना मध्यवर्ती कार्यालयात महिला मदत कक्ष स्थापन करण्यात आला आहे.

पुण्यात नोकरीच्या निमित्याने व अभ्यास करण्यासाठी आलेल्या तरुणींना सुरक्षित वाटावे यासाठी पोलीस आयुक्तांनी तातडीने उपाययोजना राबवाव्या असेही पक्षाच्या प्रवक्त्या ज्योती वाघमारे म्हणाल्या.