आदित्य ठाकरेंच्या कारला बाईकची धडक! बाईकस्वार थोडक्यात बचावला; पोलिसांकडून चौकशी सुरु

मुंबई – उद्धव ठाकरे गटाचे नेते आदित्य ठाकरे यांच्या गाडीला बाईकस्वाराने धडक दिल्याचा प्रकार समोर आला आहे. मुंबईतील शिवसेना भवनासमोर हा प्रकार घडला असून बाईकस्वाराची सध्या कसून चौकशी केली जात आहेत.

या अपघातात बाईकस्वाराला कसलीही दुखापत झाली नसून आदित्य ठाकरे यांच्या गाडीला खरचटलं आहे.

मिळालेल्या माहितनुसार, आदित्य ठाकरे आज शिवसेना भवन येथे येत असताना गाडीच्या मागून आलेला बाईक स्वार आदित्य ठाकरे यांच्या गाडीला धडकला. शिवसेना भवन येथील सिग्नलच्या पुढे येऊन आदित्य ठाकरे शिवसेना भवन येथे उजव्या बाजूला वळण घेत होते.

तेव्हा अचानक वेगाने बाईकस्वार पुढच्या चाकाजवळ धडक दिली. आदित्य ठाकरे शिवसेना भवन येथे आले यावेळी शाखाप्रमुखांना त्या बाईकस्वाराची विचारपूस करायला सांगितली. आदित्य ठाकरे यांची सुरक्षा कमी करण्यात आल्यानंतर ही घटना घडल्याने सुरक्षेचा प्रश्न उपस्थित होत आहे.