‘तारक मेहता का उल्टा चष्मा’चे निर्माते असित मोदी यांच्याविरोधात मुंबई पोलिसांनी सोमवारी लैंगिक छळाच्या आरोपाखाली गुन्हा नोंदवला. त्यांच्यासोबत मालिकेमधील आणखी दोन जणांवरही गुन्हा दाखल करण्यात आला आहे. असित मोदी हे गेल्या काही काळापासून लैंगिक शोषणाच्या आरोपांना सामोरे जात आहेत. त्यांच्याविरोधात मालिकेमधील एका अभिनेत्रीने तक्रार दाखल केली आहे. या अभिनेत्रीने मालिकेचे ऑपरेशन हेड सोहेल रमाणी आणि कार्यकारी निर्माता जतिन बजाज यांच्या विरोधातही तक्रार केली होती, ज्याच्या आधारावर पोलिसांनी गुन्हा दाखल केला.
गेल्या महिन्यात अभिनेत्रीने असित मोदी, सोहेल रमाणी आणि जतीन बजाज यांच्याविरोधात सेटवर लैंगिक छळ झाल्याची तक्रार दाखल केली होती. याप्रकरणी पोलिसांनी अभिनेत्रीचा जबाबही नोंदवला. त्यानुसार कलम 354 आणि 509 अंतर्गत एफआयआर नोंदवण्यात आला आहे.
एका मुलाखतीत या अभिनेत्रीने सांगितले की, “असित मोदी यांनी माझे लैंगिक शोषण केले. सुरुवातीला काम हातातून जाण्याच्या भीतीने मी याकडे दुर्लक्ष केले पण आता मला हे सहन होत नाही. मी हात जोडून असित मोदींची माफी मागितली. सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे मी हे आरोप पैशासाठी करत नाही. मी फक्त सत्य सांगत आहे. त्याने माझ्यावर अन्याय केला हे त्याला मान्य करावे लागेल आणि माझी हात जोडून माफी मागावी लागेल. हा माझ्या प्रतिष्ठेचा आणि स्वाभिमानाचा प्रश्न आहे.”
दुसरीकडे असित मोदींनी हे आरोप पूर्णपणे चुकीचे असल्याचे म्हटले आहे. या अभिनेत्रीवर कायदेशीर कारवाई करणार असल्याचे त्यांनी सांगितले. “ती मला बदनाम करण्याचा प्रयत्न करत आहे. शोमधून बाहेर काढल्यामुळे ती असे आरोप करत आहे.” असे असित मोदी यांचे म्हणणे आहे.