बालभारतीच्या नव्या पाठय़पुस्तकांतून क्यूआर कोड गायब

बालभारतीकडून यंदाच्या वर्षी पहिली ते आठवीच्या विद्यार्थ्यांना एकात्मिक योजनेंतर्गत पाठय़पुस्तके देण्यात आली आहेत. मात्र या नव्या पाठय़पुस्तकातून क्यूआर कोडच गायब झाले आहेत. 2016 पासून बालभारतीने पाठय़पुस्तकात धडय़ाखाली क्यूआर कोड छापण्यात सुरुवात केली. त्यामुळे प्रत्येक धडय़ाचा डिजिटल पंटेट उपलब्ध होऊन विद्यार्थ्यांचे शिक्षण अधिक रंजक बनले होते. यंदा मात्र पाठय़पुस्तकांमध्ये वह्याची पाने जोडण्याच्या नादात क्यूआर कोड छापण्याचा बालभारतीला विसर पडला आहे. एकीकडे डिजिटल इंडियाचा मोठा गाजावाजा सुरू असताना शालेय शिक्षण विभागाने मात्र पुस्तकांच्या डिजिटल रूपालाच यंदा बगल दिल्याचे बोलले जात आहे.

जिल्हा परिषद शाळेचे शिक्षक आणि ‘ग्लोबल टीचर’ पुरस्कार विजेते शिक्षक रणजितसिंह डिसले यांनी 2016 मध्ये बालभारतीकडे पाठय़पुस्तकात क्यूआर कोडचा समावेश करण्याची मागणी केली होती. बालभारतीने डिसले गुरुजींच्या या सूचनेचे स्वागत करून 2016 सालापासून छापण्यात आलेल्या बालभारतीच्या सर्व पुस्तकात धडय़ाखाली क्यूआर कोडचा समावेश करण्यात आला. क्यूआर कोडमुळे प्रत्येक धडय़ासाठी डिजिटल पंटेंट बनवून ते विद्यार्थ्यांपर्यंत पोहचत होते. राज्याच्या शालेय शिक्षण विभागाच्या या उपक्रमाचे इतरही राज्यांनीदेखील अनुकरण केले. पण अचानक या वर्षीच्या बालभारतीच्या पुस्तकात हे क्यूआर कोड छापण्यात आलेले नाहीत.

ज्या तंत्रामुळे मुलांचे शिक्षण अधिक रंजक झाले, तेच तंत्रज्ञान का काढून टाकले आहे? क्यूआर कोडपेक्षा अधिक चांगले पर्याय बालभारतीकडे आहेत का? असा सवाल डिसले गुरुजींनी केला आहे. वर्ष 2016 पासून बालभारतीच्या पुस्तकांत क्यूआर कोडचा वापर करण्यास सुरुवात झाली. असे तंत्र वापरणारे महाराष्ट्र हे देशातील पहिले राज्य होते. कोरोनाच्या काळात शाळा बंद असतानाही क्यूआर कोड पुस्तकामुळे लाखो विद्यार्थ्यांना शिक्षण घेणे सुलभ झाले.