पुणे – राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांना ९ जूनला सोशल मीडियावरुन अज्ञात व्यक्तींनी धमकी दिल्याचे समोर आले होते.’नर्मदाबाई पटवर्धन’ व ‘सौरभ पिंपळकर’ या दोन अकाऊंट्सवरुन धमकी देण्यात आली होती. त्या व्यक्तींवर तात्काळ गुन्हा दाखल करण्यात आला. मात्र अकाऊंट नेमके कोणाचे आहे याबाबत खुलासा होत नव्हता. याबाबत वेगाने हालचाली करत पोलीस प्रशासनाने ‘नर्मदाबाई पटवर्धन’ हे बनावट अकाऊंट तयार करुन शरद पवारांना धमकी देणार्या सागर बर्वे या आयटी इंजिनीअरला पुण्यातून अटक केली आहे. न्यायालयात दाखल केल्यानंतर सागरला १३ जूनपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.
राष्ट्रवादीच्या नव्या कार्यकारी अध्यक्षा आणि शरद पवारांच्या कन्या सुप्रिया सुळेंनी केलेल्या मागणीनंतर तपासाचा वेग वाढवण्यात आला. या प्रकरणात मुंबई गुन्हे शाखेने लोकमान्य टिळक मार्ग पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केल्यानंतर पुढील तपासासाठी विविध पथकं तयार करण्यात आली होती. आरोपीचा शोध घेण्यासाठी पोलिसांनी काही तांत्रिक बाबींचा आधार घेतला. अखेर आरोपीला बेड्या ठोकण्यात मुंबई गुन्हा शाखेला यश आलं. आरोपी सागर बर्वे माहिती आणि तंत्रज्ञान क्षेत्रात कार्यरत असून त्यानंच दोन्ही अकाउंट तयार केल्याचा पोलिसांना संशय आहे. सागरने असे कृत्य का केले, या मागे त्याचा नेमका काय उद्देश होता या सर्व बाजूने पोलिसांचा तपास सुरु आहे.
आरोपी सागर बर्वेने फेसबुकवर ‘नर्मदाबाई पटवर्धन’ नावाने पेज तयार केले होते. त्याने या फेसबुक पेजवरुन शरद पवार यांना उद्देशून ‘तुमचा लवकरच दाभोळकर होणार…’, अशी धमकी दिल्याचा त्याच्यावर आरोप आहे. यासोबतच सौरभ पिंपळकर नावाच्या ट्विटर हँडलवरुनही आक्षेपार्ह भाषा वापरून पोस्ट करण्यात आली होती. या पोस्टमध्ये शरद पवार यांची तुलना औरंगजेबाशी करणारा मजकूर पोस्ट करण्यात आला होता.