सांगलीत 14 कोटींचा दरोडा, 80 टक्के दागिने लांबवले; सांगलीत प्रथमच फिल्मी स्टाईल सशस्त्र दरोडा

सांगली शहरातील रिलायन्स ज्वेल्स शोरूमवर काल दुपारी सशस्त्र दरोडा पडला होता.

यामध्ये दरोडेखोरांनी 14 कोटींचे दागिने लुटून नेल्याचं समोर आलं आहे. पोलीस अधीक्षक बसवराज तेली यांनी ही माहिती दिली आहे. ही टोळी परराज्यातली होती, मात्र अजून यातील आरोपी पोलिसांच्या हाती लागलेले नाहीत. सांगली पोलिसांनी सात पथकं तयार केली आहेत. अन्य जिल्ह्यातील पोलिसांचीही मदत घेण्यात येत आहे.

सांगलीतील मार्केट यार्डजवळील वसंत कॉलनीत रिलायन्स ज्वेल्स हे भव्य शोरूम गेल्या काही वर्षापासून कार्यरत आहे. काल दुपारी तीन ते साडेतीनच्या दरम्यान शोरूममध्ये कोणीही नव्हते. तसेच मिरजेला जाणारा रस्ता दुरूस्तीच्या कामानिमित्त बंद होता. दरोडेखोर आतमध्ये आल्यानंतर पोलिस असल्याचे सांगून सर्व कर्मचाऱ्यांना एकत्र बोलवले. तपास करणार असल्याचे सांगून सर्वजण एकत्र आल्यानंतर रिव्हॉल्वर बाहेर काढून त्यांच्यावर रोखले.त्यानंतर सर्वांचे हात बांधले. काहींनी विरोध करण्याचा प्रयत्न केला असता त्यांना मारहाणही केली. दोघा कर्मचाऱ्यांना दरडावून सर्व दागिने, रोकड पिशवीत भरण्यास सांगितले. चांदीचे दागिने न घेता केवळ सोन्याचे दागिने, डायमंडस् आणि रोकड दरोडेखोरांनी घेतली.

डीव्हीआर मशिन घेतले ताब्यात

दरोडेखोरांनी शोरूमची यापूर्वी पाहणी करून सीसीटीव्ही कॅमेरे असल्याची खात्री केली होती.त्यामुळे चेहरे न झाकताच त्यांनी दरोडा टाकला. जाताना कोणताही पुरावा राहू नये म्हणून सीसीटीव्ही कॅमेरे जोडलेले डीव्हीआर मशिनही कर्मचाऱ्यांना सांगून काढून घेतले.गडबडीत एक डीव्हीआर मशिन खाली पडून फुटले. त्यामुळे ते तसेच सोडून दरोडेखोर पळाले. पोलिसांना हे डीव्हीआर मशिन मिळाले असून त्यातील फुटेज शोधले जाणार आहे.

ग्राहकावर गोळीबार

दरोडा टाकल्यानंतर सर्व दागिने लुटले जात असतानाच एक ग्राहक आतमध्ये आला. तो दरोडेखोरांना पाहून पळून जात असताना त्याच्यावर गोळीबार केला. तेव्हा शोरूमची दर्शनी बाजूची काच फुटली. सुदैवाने ग्राहकाला गोळी लागली नाही. परंतु काच लागून तो जखमी झाला.

दोन मोटारीतून आले दरोडेखोर

दरोडेखोर दोन मोटारीतून आले. 9 ते 10 जण असल्याची माहिती प्राथमिक तपासात पुढे आली आहे. ते सर्वजण परजिल्ह्यातील असल्याचे स्पष्ट होत आहे. शोरूमच्या दारातील रस्ता तसेच मिरजेकडे जाणारा रस्ता वाहतुकीसाठी बंद असल्यामुळे दरोडा पडल्याचे तत्काळ कोणाला लक्षात आले नाही.

पथके रवाना

पोलिस अधीक्षक डॉ. बसवराज तेली यांनी घटनास्थळी भेट देऊन माहिती घेतली. त्यानंतर स्थानिक गुन्हे अन्वेषणच्या पथकाला तपासाच्या सूचना दिल्या. गुन्हे अन्वेषणची खास सात पथके तयार करण्यात आली असून ती दरोडेखोरांच्या शोधासाठी रवाना करण्यात आली आहेत.तसेच सर्व पोलिस अधिकारी तपासात गुंतले आहेत.

80 टक्के दागिने लांबवले

दरोडेखोरांनी 14 कोटीहून अधिक रकमेचे दागिने लांबवल्याचे प्राथमिक तपासात स्पष्ट झाले आहे. जवळपास 80 टक्के दागिने त्यांनी लांबवले आहेत. एकूण किती मुद्देमाल लांबवला याची माहिती घेण्याचे काम उशिरापर्यंत सुरू होते.

सांगलीत प्रथमच फिल्मीस्टाईल सशस्त्र दरोडा

सांगलीत आतापर्यंत अनेक दरोडे पडले आहेत. परंतु अशाप्रकारे भरदिवसा फिल्मी स्टाईलने दरोडा टाकून गोळीबार करून कोट्यवधी रूपयांचा ऐवज नेण्याची ही पहिलीच घटना आहे. त्यामुळे दरोडेखोरांना पकडण्याचे पोलिसांसमोर आव्हान आहे.

jalgaonsandesh

jalgaonsandesh