आयपीएलच्या सोळाव्या हंगामाच्या अंतिम सामन्यात चेन्नई सुपरकिंग्जने गुजरात टायटन्सचा पराभव केला. शेवटच्या चेंडूपर्यंत अतीतटीच्या झालेल्या या सामन्यात चेन्नईने बाजी मारली. या विजेतपदासह चेन्नईने पाचव्यांदा जेतेपदावर नाव कोरले आहे.
रविवारी पावसामुळे रद्द झालेला अंतिम सामना सोमवारी वेळेवर सुरू झाला. मात्र दुसऱ्या इंनिंगमध्येही पावसाने गोंधळ घातला. तब्बल दोन तासाच्या ब्रेकनंतर सामना पुन्हा सुरू झाला. डकवर्थ लुईसच्या नियमानुसार चेन्नईला विजयासाठी 15 षटकात 171 धावांचे टार्गेट देण्यात आले होते. हे अशक्यप्राय आव्हान चेन्नईच्या फलंदाजांनी पूर्ण केले.
चेन्नईतर्फे सर्वाधिक धावा डेव्हॉन कॉनवेने केल्या. 25 चेंडूत त्याने 47 धावा फटकावल्या. ऋतुराज गायकडवाड (26), शिवम दुबे (32), अजिंक्य रहाणे (27), अंबाती रायुडू (19) आणि रवींद्र जाडेजा याने 15 धावा केल्या.
चेन्नईला निर्णायक क्षणी जाडेजानेच विजय खेचून आणून दिला. त्याने 6 चेंडूत 15 धावा चोपल्याच शिवाय 3 चेंडूत 11 धावा असं अवघड गणित झालेलं असताना षटकार आणि चौकार खेचत सामनाही जिंकून दिला. या सामन्यासाठी क्रिकेटपटू केदार जाधव हा मराठीतून समालोचन करत होता. चेन्नईच्या विजयानंतर त्याची प्रतिक्रिया ही सोशल मीडियावर व्हायरल झाली आहे.
Kedar Jadhav's reaction for MS Dhoni. pic.twitter.com/p4dKTmvHAn
— Mufaddal Vohra (@mufaddal_vohra) May 29, 2023
केदार जाधव हा स्वत: धोनीचा मोठा चाहता आहे आणि तो यापूर्वी चेन्नई सुपरकिंग्जकडून खेळलेला आहे. चेन्नईच्या चाहत्यांप्रमाणेच केदार जाधवलाही धोनीच्या संघाने हा सामना जिंकल्याने प्रचंड आनंद झाला होता. जाधव आपला आनंद लपवू शकला नाही आणि तो म्हणाला की “महेंद्रसिंह धोनीने दाखवून दिलंय, एकच वादा धोनी दादा. पाचव्यांदा विजेतेपद पटकावलंय. गुजरातला घरात घुसून हरवलं आहे.”