IPL च्या फायनलवर पावसाचे संकट, सामना रद्द झाला तर कोण होणार चॅम्पियन?

अहमदाबाद 28 मे –  आयपीएल 2023चा अंतिम सामना आज गुजरात आणि चेन्नई यांच्यात होणार आहे. अमहदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर होणाऱ्या या सामन्यात दोन्ही संघ विजय मिळवण्याच्या इराद्याने उतरतील.

हार्दिक पांड्याच्या नेतृत्वाखाली सलग दुसऱ्यांदा गुजरात विजेतेपदासाठी उत्सुक आहे तर धोनीच्या नेतृत्वाखाली चेन्नई सुपर किंग्ज पाचव्यांदा विजय पटकवण्यासाठी प्रयत्नशील असेल. दरम्यान, या सामन्यावर पावसाचे संकट आहे. क्लालिफायर दोन सामन्यात पावसामुळे सुरुवातीला व्यत्यय आला होता. सामना तासभर उशिराने सुरू करावा लागला होता.

त्यातच आज रविवारी अहमदाबादमध्ये वातावरण बदलत आहे. त्यामुळे आयपीएल फायनलमध्ये पावसाची शक्यता व्यक्त केली जात आहे. पावसामुळे सामना रद्द झाला तर कोणता संघ चॅम्पियन होणार असा प्रश्न निर्माण होता .

सकाळी अहमदाबादचे वातावरण सामान्य असून ऊन पडलं आहे. मात्र सायंकाळी वातावरणात कमालीचा बदल होऊन ढग येतील असं Accuweatherने म्हटलं आहे. सायंकाळी पावसाची शक्यता जवळपास 70 टक्के इतकी आहे. तर वारे 50 किमी प्रतितास वेगाने वाहण्याची शक्यता आहे.

याशिवाय 78 टक्के ढगाळ वातावरण असेल असंही Accuweatherने म्हटलंय. गेल्या वर्षी आयपीएलमध्ये फायनलसाठी राखीव दिवस होता. पण यावर्षी असा राखीव दिवस नाही. आयपीएल 2023च्या फायनलचा निर्णय आजच होईल.

सामना सायंकाळी साडे सात वाजता सुरू होईल. पावसाने व्यत्यय आणला तर किमान 5-5 षटकांचा सामना खेळवण्यासाठी 11 वाजून 56 मिनिटांपर्यंत कट ऑफ वेळ राहील. जर सामना 8 वाजता सुरू झाला तर कट ऑफ टाइम 12.26 पर्यंत असेल. या वेळेपर्यंत पंच 5-5 षटकांचा सामना होण्यासाठी वाट पाहतील.

कट ऑफ टाइमनंतरही सामन्यात पावसाचा व्यत्यय आल्यास सुपर ओव्हर खेळवली जाईल. सुपर ओव्हरमध्येही पाऊस पडत राहिला आणि वेळ न मिळाल्यास चॅम्पियन ठरवण्याचा निर्णय लीग फेरीतील पॉइंट टेबलच्या आधारे घेतला जाईल. आयपीएल 2023 च्या पॉइंट टेबलमध्ये गुजरात टायटन्स 20 पॉइंटसह अव्वल स्थानी होते. तर चेन्नई सुपर किंग्ज 17 गुणांसह दुसऱ्या क्रमांकावर राहिले. त्यामुळे पावसाने सामना रद्द करावा लागल्यास गुजरात टायटन्सला विजेता घोषित केलं जाईल.