रसायनशास्त्राच्या पेपरमध्ये ‘बाजीगर’चे उत्तर

बारावी परीक्षेचा निकाल 25 मे रोजी लागला. बारावीची परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांचे पेपर तपासणे ही एक मोठी डोकेदुखी असते. याचं कारण म्हणजे उत्तरं येत नसल्यामुळे विद्यार्थ्यांकडून होणारी फेकाफेकी. अनेक विद्यार्थ्यांना वाटतं की लांबलचक उत्तरं लिहिली तर जास्त मार्क मिळतील. मात्र खरी बाब अशी आहे की उत्तर छोटे असो अथवा मोठे. त्यात विषय समजला असल्याचे प्रदर्शन झाले तरच मार्क मिळतात. फेकाफेकी असल्यास भोपळा मिळतो. अनेकदा अशी फेकाफेकी केलेली उत्तरं वाचून उत्तरपत्रिका तपासणाऱ्या शिक्षकांचेही मनोरंजन होते.

उत्तरं येत नसली की विद्यार्थी पेपरमध्ये चित्रपटाच्या कहाण्या लिहितात, कधी गाणी लिहितात तर कधी शेरो-शायरीपण लिहितात. रत्नागिरी बोर्डात तपासणीचे काम करणाऱ्या सुरेश जोशी यांच्याकडे छत्रपतीसंभाजीनगर मधल्या बारावीच्या विद्यार्थ्याचा पेपर तपासणीसाठी आला होता. रसायनशास्त्राची उत्तरे फार मोठी नसतात. मात्र या विद्यार्थ्याने एक उत्तर लांबलचक लिहिलं होतं. उत्सुकता म्हणून जोशी यांनी ते वाचलं असता त्यांना ती एक कथा असल्याचं कळालं. पेपर तपासल्यानंतर ही कथा एका चित्रपटाची असून या चित्रपटाचे नाव बाजीगर असल्याचं कळालं. या चित्रपटात शाहरूख खान आणि काजोल असल्याची उपयुक्त माहितीही जोशी यांना मिळाली. या विद्यार्थ्याने अडीज पाने भरून या प्रश्नाचं उत्तर लिहिलं होतं, मात्र तरीही त्याला शून्य मार्क देण्याशिवाय जोशी यांच्यासमोर पर्याय नव्हता.

कधीकधी विद्यार्थी पेपर तपासणाऱ्यांना खूश करण्यासाठी पेपरमध्ये नोटा ठेवतात. कधी या नोटा 100 च्या असतात, कधी 200 च्या तर कधी 500 च्या असतात. मुकुंद आंधळकर कनिष्ठ महाविद्यालय महासंघाचे समन्वयक आहेत. त्यांनी सांगितले की त्यांच्याकडे तपासणीसाठी आलेल्या एका पेपरमध्ये विद्यार्थ्याने या विषयात नापास होण्यापासून आता मला फक्त देवच वाचवू शकतो असं लिहिलं होतं. त्याने मुक्त हस्ताने आपल्याला मार्क द्या असं आवाहनही केलं होतं. ज्या प्रश्नांची उत्तरं लिहिली नव्हती त्यांनाही मार्क देण्याचे या विद्यार्थ्याने आवाहन केलं होतं.

काही विद्यार्थी हे पेपरच्या पहिल्या आणि शेवटच्या पानावर श्लोक किंवा मंत्र लिहितात, मात्र योग्य उत्तरं न दिल्याने ते नापास होतात. काही विद्यार्थी हे तपासणी करणाऱ्याला उत्तीर्ण न केल्यास बरंवाईट करण्याची धमकी देतात. एका विद्यार्थ्याने लिहिलं होतं, जर मला उत्तीर्ण केलं नाही तर जीव देईन अशी धमकी दिली होती.