2 हजाराच्या कितीही नोटा बँक खात्यात जमा करू शकता, ओळखपत्राची, फॉर्म भरण्याची गरज नाही

दोन दिवसांपासून अवघा देश ‘गुलाबी टेन्शन’मध्ये आहे. दोन हजाराची नोट बँकेत कशी बदली करायची? खात्यात जमा केली तर चालेल का? या प्रश्नांच्या जंजाळात अडकलेल्यांना स्टेट बँकेने दिलासा दिला असून तुमच्या बँक खात्यात दोन हजाराच्या कितीही नोटा तुम्ही जमा करू शकता.

शिवाय नोटा बदलण्यासाठी ओळखपत्र वा फॉर्म भरण्याची गरज नाही, असे देशातील सर्वात मोठय़ा बँकेने स्पष्ट केले आहे.

तुम्ही कोणत्याही बँकेच्या शाखेत जाऊन नोटा बदलू शकता. यासाठी त्या बँकेत तुमचे खाते असणे आवश्यक नाही. थेट काऊंटरवर जाऊन नोटा बदलता येतील. शिवाय जर तुमचे त्या बँकेत खाते असेल तर हे पैसे तुमच्या खात्यातही जमा करू शकता.

दिवसाला दोन हजाराच्या फक्त दहा नोटाच तुम्हाला बदलता येतील असे शुक्रवारी आरबीआयने म्हटले होते. मात्र तुम्ही तुमच्या खात्यात 2 हजाराच्या कितीही नोटा जमा करू शकता, असे बँकेने आता स्पष्ट केले आहे. 30 सप्टेंबरपर्यंत ही अदलाबदली करायची आहे, पण त्यानंतरही ही नोट कायदेशीर राहील असेही बँकेने स्पष्ट केले, हे विशेष!

500 ची छपाई जोरात

आता 500 रुपयांच्या नोटांची छपाई जोरात सुरू झाली आहे. अर्थ मंत्रालयाने नाशिक करन्सी नोट प्रेसला 500 रुपयांच्या 195 कोटी नोटा छापण्याचे उद्दिष्ट दिले असून एप्रिलपासून आतापर्यंत 30 कोटी नोटा छापूनही झाल्या आहेत. उर्वरित 165 कोटी नोटा तीन महिन्यांत छापणे बंधनकारक आहे.

– देवास येथील प्रेसलाही असेच उद्दिष्ट दिले असून येथे 2.20 कोटी नोटा छापल्या जातील. त्यासाठी 1 हजार 100 कर्मचारी अकरा तासांच्या दोन पाळय़ांमध्ये काम करतील. सर्व कर्मचाऱयांची रविवार साप्ताहिक सुट्टी रद्द करण्यात आली आहे. या प्रेसमध्ये 20, 50, 100, 200, 500 रुपयांच्या नोटांची छपाई होते. रविवारपासून मात्र फक्त 500 रुपयांच्यात नोटेचीच छपाई केली जाणार आहे.