पाकिस्तानातून आलेल्या निर्वासित हिंदूंची घरे तोडली, जिल्हाधिकारी टिना डाबी यांच्यावर कारवाईची शक्यता

पाकिस्तानातून हिंदुस्थानात परत आलेल्या निर्वासित हिंदूंची घरे तोडल्याचे प्रकरण राजस्थानात चांगलेच तापले आहे. जैसलमेरच्या जिल्हाधिकारी टिना डाबी या टीकेच्या धनी बनल्या असून त्यांनी आकसापोटी ही कारवाई केल्याचा त्यांच्यावर आरोप केला जात आहे.

जैसलमेर जिल्हा मुख्यालयापासून अवघ्या 4 किलोमीटर अंतरावर पाकिस्तानातून आलेल्या हिंदूंनी आपला निवारा उभा केला होता. ज्या ठिकाणी त्यांनी आसरा बनवला होता ती सरकारी जमीन आहे. त्यामुळे त्यांना तिथून हुसकावून लावण्याचे आदेश देण्यात आले होते. यानंतर टिना डाबी यांनी 50 हून अधिक घरे उद्ध्वस्त केली. यासाठी बुलडोझर आणि जेसीबीचीही मदत घेण्यात आली होती.

या कारवाईनंतर जिल्हाधिकारी डाबी यांच्यावर टीका केली जात असून राजस्थानातील मंत्री प्रताप सिंह खाचरियावास यांनीही या कारवाईबद्दल नाराजी व्यक्त केली आहे. डाबी यांचे नाव न घेता ते म्हणाले की, अधिकाऱ्यांनी ज्या पद्धतीने ही कारवाई केली आहे ते चूक आहे. या अधिकाऱ्यांवर कारवाई केली जाईल.

खाचरियावास यांनी म्हटले की, अधिकाऱ्यांनी जी कारवाई केली आहे ती चुकीची आहे. या कारवाईबद्दल त्यांना उत्तर द्यावं लागेल. आम्ही त्यांच्याविरोधात कारवाई करू. जैसलमेरमध्ये पाकिस्तानातून आलेले हिंदू निर्वासित रिकाम्या जमिनीवर राहात आहेत. त्यांना सरकारकडून आवश्यक ती कागदपत्रे दिली जात आहेत. मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांनी याबाबतची घोषणा केली आहे. सरकारने स्पष्ट केलं आहे की या नागरिकांचे पुनर्वसन होईपर्यंत त्यांना बेदखल केलं जाऊ शकत नाही. यामुळे घडलेला प्रकार हा गंभीर आहे.

jalgaonsandesh

jalgaonsandesh