पंतप्रधान नरेंद्र मोदी आज ७१ हजार तरुणांना देणार ऑफर लेटर

पंतप्रधान नरेंद्र मोदी १६ मे रोजी व्हिडीओ काँफरंसिंगद्वारे सरकारी विभागात नियुक्त तरुणांना नियुक्ती पत्र देतील.

यावेळी ते या नवनियुक्त कर्मचाऱ्यांशी संवाद साधणार आहेत. पंतप्रधान कार्यालयाच्या माहितीनुसार या रोजगार मेळाव्याचे आयोजन देशभरात ४५ ठिकाणी होईल. मागील काही महिन्यांपासून केंद्रिय मंत्रालय आणि विभागात मिशन मोड अंतर्गत रिक्त जागा भरण्यासाठी काम केले जात आहे.

१० लाख नोकऱ्या देण्याचं जाहीर

मागच्या वर्षी जून महिन्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी विविध सरकारी पदे भरत हे जाहिर केलं होतं की, पुढील दीड वर्षात ते १० लाख लोकांना नोकरी देतील. रोजगाराच्या विषयावरून विरोधी पक्ष कायमच सरकारला टार्गेट करत आले आहे. त्यांमुळे ही रोजगार भरती मोठा भाग ठरणार हे उघड आहे.

त्यामुळे निवडणुकी आधी होणारी ही रोजगार भरती मोठी राजनैतीक खेळी असल्याचंही काही लोक म्हणत आहेत. यानंतर पंतप्रधान मोदी यांनी दर महिन्याला नियुक्ती पत्र वाटण्यास सुरुवात केली.

सर्व स्तरातील अधिकारी आणि कर्मचाऱ्यांचा समावेश

हे नियुक्ती पत्र सर्वच स्तरातील अधिकारी आणि कर्मचारी यांना वाटण्यात येणार आहे. यात ग्रामीण टपाल सेवक, पोस्टल इन्स्पेक्टर, कमर्शियल आणि तिकीट लिपिक, कनिष्ठ लिपिक आणि टंकलेखक, कनिष्ठ खाते लिपिक, ट्रॅक मेंटेनर, सहायक विभाग अधिकारी, कनिष्ठ विभाग लिपिक, उपविभागीय अधिकारी, कर सहाय्यक, सहाय्यक अंमलबजावणी अधिकारी, निरीक्षक, नर्सिंग अधिकारी, सहाय्यक सुरक्षा अधिकारी, अग्निशमन अधिकारी, सहायक लेखा अधिकारी, सहायक लेखापरीक्षा अधिकारी, विभागीय खाते निरीक्षक, खाते परीक्षक, कॉन्स्टेबल, हेड कॉन्स्टेबल, असिस्टंट कमांडंट, मुख्याध्यापक, प्रशिक्षित पदवीधर शिक्षक, सहाय्यक निबंधक, सहाय्यक प्राध्यापक इत्यादी विविध पदांची नियुक्ती केली जाईल.