राज्यातील शिक्षकांना ‘या’ स्पर्धेद्वारे साडेदहा कोटी रुपयांची बक्षीसे जिंकण्याची संधी!

महाराष्ट्र – सद्यःस्थितीत राज्यामधील शिक्षकांमध्ये तंत्रस्नेही चळवळ अधिक सक्रिय झाली आहे.

राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद, महाराष्ट्र यांचेमार्फत राज्यातील २ लाख ८९ हजार ५६० शिक्षक हे तंत्रस्नेही झाल्याचे आढळून आले आहे.

यासह राज्यातील इतर शिक्षकांमध्ये निकोप स्पर्धा निर्माण होऊन इ- साहित्य निर्मितीची चळवळ उभी राहावी, यासाठी राज्य शासनाने १० कोटी ४८ लाख ३२ हजार रुपयांची बक्षीसे जाहीर केली आहेत. यात राज्यातील सर्व माध्यमांच्या सर्व व्यवस्थापनाच्या प्राथमिक, माध्यमिक, उच्च माध्यमिक शिक्षक, प्रशिक्षक स्तरावरील शिक्षक, मुख्याध्यापक यांचेसाठी राज्यस्तरावर दर्जेदार शैक्षणिक व्हिडिओ निर्मितीची खुली स्पर्धा आयोजित केली आहे.

आजच्या आधुनिक काळामध्ये ऑनलाइन शिक्षणाला अनन्य साधारण महत्त्व आहे. शैक्षणिक तंत्रज्ञानाद्वारे शिक्षक, शिक्षक प्रशिक्षक आणि विद्यार्थ्यांच्या ज्ञानाची देवाणघेवाण आणि क्षमता निर्माण करण्याच्या दिशेने एक पाऊल म्हणून माहिती संप्रेषण आणि तंत्रज्ञानाचा सध्या मोठ्या प्रमाणावर वापर होताना दिसत आहे.

यामुळे डिजिटल शिक्षणाचे वेगळेच महत्त्व निर्माण झालेले आहे. कोविड-१९ काळात प्रत्यक्ष शाळा बंद असताना ऑनलाइन शिक्षणाच्या विविध माध्यमाद्वारे व साधनांद्वारे वर्गावर्गातून अध्ययन-अध्यापन प्रणाली घडताना दिसून येत होती. शिक्षक, विद्यार्थी कधी शाळेच्या ओट्यावर, कधी शेतात, कधी मंदिराच्या ओट्यावर, कधी निवासी पार्किंगमध्ये तर कधी गल्लीतील चौकात एकत्र येऊन ऑनलाइन प्रणालीने अभ्यास, चाचण्या पूर्ण करताना दिसत होते.

इतर देशातील शिक्षक व विद्यार्थी यांच्याशी ऑनलाइन संवाद

शिक्षक आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून आपले अध्यापन अधिक रंजक आणि दर्जेदार करण्याचा प्रयत्न करताना दिसत आहेत. तसेच विद्यार्थी याच डिजिटल साधनांचा वापर करून आपले अध्यापन सुकर करताना आढळून येत आहे.

तंत्र स्नेही शिक्षकांनी फक्त आपापले वर्गच ऑनलाइन घेतलेले नाहीत तर स्वतःच्या विद्यार्थ्यांनाही तंत्रस्नेही केलेले आहे, ज्यामुळे आज राज्यातील विद्यार्थी स्वतः डिजिटल साहित्य तयार करून आपले शिक्षण मनोरंजक करत आहेत. इतर देशातील शिक्षक व विद्यार्थी यांच्याशी ऑनलाइन संवाद साधून विविध साहित्य वापरत आहेत.

यात शैक्षणिक व्हिडिओ, मनोरंजक खेळ, AI/AR/VR वापर करून बनविलेले इ -साहित्य, कृतियुक्त पीडीएफ, आनंददायी पीपीटी, पोस्टर्स, प्रमाणपत्रे तयार केली होती. त्याचप्रमाणे तंत्रज्ञानाच्या साह्याने अध्यापन करत असताना शिक्षकांमार्फत बनवले गेलेले इ -साहित्य हे जास्त परिणामकारक असल्याचे दिसून येत आहे, या पार्श्वभूमीवर ही स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे.

प्रत्येक तालुका, जिल्हा व राज्यस्तरावर विषय व गटनिहाय प्रथम तीन क्रमांक निवडण्यात येतील. यातील उत्कृष्ट शिक्षकांना रोख बक्षीस व प्रशस्तीपत्र देऊन गौरवांकीत करण्यात येणार आहे. तसेच सहभागी स्पर्धक यांनाही सहभाग प्रमाणपत्र देण्यात येणार आहे.

असे राहतील शिक्षकांसाठी गट

पहिला गट – १ली ते २ री

दुसरा गट– ३ री ते ५ वी

तिसरा गट- ६ वी ते ८ वी

चौथा गट- ९ वी ते १० वी

पाचवा गट- ११ वी व १२ वी

सहावा गट- अध्यापक विद्यालय

अशी राहील निवड समिती

तालुका स्तरावरील निवड समिती

अध्यक्ष- गटशिक्षणाधिकारी किंवा प्रशासन अधिकारी

सदस्य- अधिव्याख्याता DIET

सदस्य- तंत्रस्नेही / पुरस्कार प्राप्त शिक्षक (०२)

सदस्य सचिव- शिक्षण विस्तार अधिकारी किंवा केंद्रप्रमुख

जिल्हा स्तरावरील निवड समिती

अध्यक्ष- डायटचे प्राचार्य

सदस्य- डायटचे वरिष्ठ अधिव्याख्याता

सदस्य- शिक्षणाधिकारी (प्राथमिक)

सदस्य- तंत्रस्नेही पुरस्कार प्राप्त शिक्षक (०२)

सदस्य सचिव- शिक्षणाधिकारी (माध्यमिक)

राज्य स्तरावरील निवड समिती

अध्यक्ष- राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषदेचे संचालक (पुणे)

सदस्य- राष्ट्रीय ICT पुरस्कार प्राप्त शिक्षक (०२)

सदस्य- उपविभागप्रमुख, आय. टी.

सदस्य- उपविभागप्रमुख, प्रसारमाध्यम

सदस्य सचिव- प्राचार्य (आय. टी. व प्रसार माध्यम), राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद, महाराष्ट्र, पुणे

असे आहे वेळापत्रक

मे- जाहिरात प्रसिद्धी

जून- ऑनलाइन नामांकन नोंदणी

जुलै- तालुका व जिल्हास्तर निवड समितीमार्फत पडताळणी व पुढील टप्प्यासाठी उत्कृष्ट उमेदवारांची शिफारस

ऑगस्ट- राज्यस्तर निवड समितीमार्फत पडताळणी व अंतिम उत्कृष्ट उमेदवारांची शासनास शिफारस

५ सप्टेंबर- पुरस्कार वितरण समारंभ

तालुकास्तरीय

प्रथम पुरस्कार- ५ हजार रोख व प्रमाणपत्र

द्वितीय पुरस्कार- ४ हजार रोख व प्रमाणपत्र

तृतीय पुरस्कार- ३ हजार रोख व प्रमाणपत्र

एकूण तालुके – ४०८

पुरस्कार रक्कम- ७ कोटी ४२ लाख ५६ हजार

जिल्हास्तरीय

प्रथम पुरस्कार- १० हजार रोख व प्रमाणपत्र

द्वितीय पुरस्कार- ९ हजार रोख व प्रमाणपत्र

तृतीय पुरस्कार- ८ हजार रोख व प्रमाणपत्र

एकूण जिल्हे – ३६

पुरस्कार रक्कम- २ कोटी ७२ लाख १६ हजार

राज्यस्तरीय

प्रथम पुरस्कार- ५० हजार रोख व प्रमाणपत्र

द्वितीय पुरस्कार- ४० हजार रोख व प्रमाणपत्र

तृतीय पुरस्कार- ३० हजार रोख व प्रमाणपत्र

एकूण राज्य -१

पुरस्कार रक्कम- ३३ लाख ६० हजार

व्हिडिओ निर्मितीसाठी गुणदान

स्पष्टपणा – १५ गुण

गरजाचीष्ठितपणा – १५ गुण

परिणाम – १५ गुण

नावीन्यता- १५ गुण

समन्वय- १५ गुण

उपयोगिता – १५ गुण

चित्रफीत दर्जा- १० गुण

एकूण – १०० गुण

jalgaonsandesh

jalgaonsandesh