उद्धव ठाकरे श्रीक्षेत्र शनिशिंगणापुरात दाखल, सपत्नीक घेतले शनी महाराजांचे दर्शन

शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे शुक्रवारी श्री क्षेत्र शनी शिंगणापूर येथे दाखल झाले. तेथे त्यांनी माजी खासदार यशवंतराव गडाख यांची त्यांच्या निवासस्थानी भेट घेऊन त्यांचे अभिष्टचिंतन केले. तर त्यानंतर श्री क्षेत्र शनिशिंगणापूर येथे पोहोचल्यानंतर उद्धव ठाकरे व सौ. रश्मी ठाकरे यांनी शनी महाराजांच्या चौथर्‍यावर जाऊन अभिषेक करत दर्शन घेतले. दरम्यान, ‘मी गडाखांना तुमच्याकडे येणार असा शब्द दिला होता व तो मी पाळला’ अशी प्रतिक्रिया उद्धव ठाकरे यांनी प्रसारमाध्यमांना दिली.

उद्धव ठाकरे शुक्रवारी नगर जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत असल्यामुळे गुरुवारपासून सर्वत्र स्वागताचे फलक व कमानी लावण्यात आल्या होत्या. प्रत्येक ठिकाणी जोरदार शक्तीप्रदर्शन करत त्यांचे स्वागत करण्यात आले. शिर्डी या ठिकाणी शिवसेनेच्या वतीने भव्य असे स्वागत झाल्यानंतर उद्धव ठाकरे हे सोनईकडे रवाना झाले होते. सोनई या ठिकाणी माजी खासदार यशवंतराव गडाख यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने एक घरगुती कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. त्याप्रसंगी उद्धव ठाकरे उपस्थित राहून त्यांनी गडाख यांना शुभेच्छा देत त्यांचे अभिष्टचिंतन केले. यावेळी सौ. रश्मी ठाकरे व शिवसेनेचे सचिव मिलिंद नार्वेकर, आमदार शंकरराव गडाख, माजी आमदार विजय औटी, युवा सेनेचे राज्य सहसचिव विक्रम राठोड, उदयनराजे गडाख, माजी सभापती सुनील गडाख, जिल्हाप्रमुख प्रा शशिकांत गाडे, जिल्हाप्रमुख रावसाहेब खेवरे, जिल्हाप्रमुख प्रमोद लबडे, जिल्हाप्रमुख राजेंद्र दळवी, उपजिल्हाप्रमुख गिरीश जाधव, उपजिल्हाप्रमुख हरिभाऊ शेळके, महापौर रोहिणी शेंडगे, माजी महापौर भगवान फुलसौंदर, माजी महापौर अभिषेक कळमकर अशोक गायकवाड यांच्यासह अनेक शिवसैनिक, पदाधिकारी उपस्थित होते.

उद्धव ठाकरे यांचे सोनई येथे आमदार गडाख यांच्या निवासस्थानी स्वागत करण्यात आले. या ठिकाणी कुटुंबातील सर्वजण उपस्थित होते. उद्धव ठाकरे यांच्या हस्ते माजी खासदार यशवंतराव गडाख यांच्या 80 व्या वाढदिवसानिमित्त त्यांनी त्यांचे अभिष्टचिंतन केले. त्यानंतर उद्धव ठाकरे यांच्या समवेत यशवंतराव गडाख व आमदार शंकर गडाख यांच्यामध्ये बऱ्याच वेळेस चर्चा सुरू होती. यावेळी उद्धव ठाकरे यांनी यशवंतराव गडाख यांची विचारपूस केली. यानंतर बोलताना ठाकरे म्हणाले की, मी जे काही राजकीय बोलायचे आहे ते सकाळीच बोललेलो आहे, या ठिकाणी मला यायचे होते. मी गडाखांना त्यावेळेला शब्द दिलेला होता की तुमच्याकडे मी नक्की येणार आहे. तो शब्द मी आज पूर्ण केलेला आहे. अभिष्टचिंतन करण्यासाठी मी येथे आलेलो आहे. गडाखांसारखे लढवय्ये आमच्या समवेत आहेत. आमदार शंकरराव गडाख हे सुद्धा लढवय्ये आमदार आहेत, अशी प्रतिक्रिया उद्धव ठाकरे यांनी यावेळी दिली.

यानंतर उद्धव ठाकरे व सौ. रश्मी ठाकरे यांनी श्री शेत्र शनिशिंगणापूर या ठिकाणी येऊन शनी महाराजांच्या चौथ्यावर जाऊन विधिवत पूजा करून दर्शन घेतले. श्री क्षेत्र शनिशिंगणापूर येथे आल्यानंतर या ठिकाणी भाविक सुद्धा मोठ्या प्रमाणामध्ये उपस्थित होते. उद्धव ठाकरे यांनी या ठिकाणी दर्शन घेतल्यानंतर ते ज्या वेळेला बाहेर येत होते, त्या वेळेला या ठिकाणी आलेल्या भाविकांनी ‘जय महाराष्ट्र’ अशी जोरदार घोषणाबाजी केली व त्याला उद्धव ठाकरे यांनीही साथ दिली.

jalgaonsandesh

jalgaonsandesh