कर्नाटकमध्ये कोण बाजी मारणार? तीन सर्वेक्षणामधून जनतेचा कौल स्पष्ट, शंभरच्या वर जागा जिंकून 

कर्नाटक –  निवडणुकीच्या प्रचाराच्या तोफा आज थंड होणार असून 10 तारखेला निवडणुकीसाठी मतदान होणार आहे.

सर्वच राजकीय पक्ष आपल्या विजयाचा दावा करत असले तरी कर्नाटकात सत्ता कुणाची येणार हे अवघ्या पाच दिवसात स्पष्ट होणार आहे. 2024 सालच्या लोकसभा निवडणुकीची ही रंगीत तालीम असल्याने काँग्रेस, भाजप आणि जनता दल या तिन्ही पक्षांनी त्यांची ताकद लावली आहे.

कर्नाटक निवडणुकीपूर्वी तीन प्री-पोल सर्वेक्षणांमध्ये काँग्रेस मोठ्या बहुमताने कर्नाटकात सत्तेत येणार असल्याचं सांगितलं आहे. तर झी न्यूज-मॅट्रिझने आपल्या जनमत सर्वेक्षणात भाजपला पुन्हा विजय मिळण्याची शक्यता वर्तवली आहे.

ABP-CVoter – कर्नाटकात काँग्रेस सत्तेत येणार

ABP-CVoter च्या ओपिनियन पोलनुसार, कर्नाटकमध्ये काँग्रेस सरकार स्थापन करण्याची शक्यता आहे. तर यावेळी भाजपला मोठा फटका बसू शकतो आणि जनता दलाची (जेडीएस) कामगिरी सरासरीपेक्षा कमी राहण्याची अपेक्षा आहे. ओपिनियन पोलमध्ये असेही म्हटले आहे की कर्नाटकातील 224 विधानसभा जागांपैकी काँग्रेस 107 ते 119 जागा जिंकू शकते, तर जेडीएसला केवळ 23 ते 35 जागा मिळण्याची शक्यता आहे. मतदानपूर्व सर्वेक्षणानुसार काँग्रेसला जवळपास 40 टक्के मतं मिळू शकतात. त्याचवेळी भाजपला काँग्रेसपेक्षा पाच टक्के मतांनी पिछाडीवर दाखविण्यात आले आहे. म्हणजेच त्यांना 35 टक्के मते मिळण्याची शक्यता आहे. त्याच वेळी जेडीएसला 17 टक्के मते मिळू शकतात असं या सर्वेमध्ये सांगण्यात आलं आहे.

इंडिया टुडे सी व्होटर सर्वे – काँग्रेस सत्तेत येणार

इंडिया टुडे-सी व्होटरच्या ओपिनियन पोलनेही यावेळी कर्नाटक विधानसभा निवडणुकीत भाजपचा पराभव होण्याची शक्यता वर्तवली आहे. इंडिया टुडे पोलनुसार, 2018 च्या निवडणुकीपेक्षा भाजपला 24 कमी जागा मिळतील, म्हणजेच भाजप यावेळी फक्त 74-86 जागा जिंकू शकेल असं सांगितलं आहे. त्याच वेळी सर्वेक्षणात काँग्रेस पक्षाचे सध्याचे विरोधी पक्षनेते सिद्धरामय्या यांना 42 टक्के मतांसह सर्वाधिक पसंतीचे नेते म्हणून दाखवण्यात आले आहे. भाजपचे विद्यमान मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांना 31 टक्के मतांसह दुसऱ्या क्रमांकाचे सर्वाधिक पसंतीचे नेते म्हणून सांगितलं आहे.

त्याचप्रमाणे एका कन्नड आउटलेट एडिनाने आपल्या पोलमध्ये दावा केला आहे की, काँग्रेस 32-140 जागा जिंकत स्पष्ट बहुमताकडे वाटचाल करत आहे. तर भाजपला 33 टक्के मतं मिळण्याची शक्यता आहे. यासोबतच भाजप 57 जिंकण्याचा अंदाज आहे.

झी न्यूज-मॅट्रिझ आणि कन्नड वृत्तवाहिनी सुवर्ण न्यूज 24×7 ने केलेल्या सर्वेक्षणात सत्ताधारी भाजप पुन्हा सर्वात मोठा पक्ष म्हणून उदयास येईल असा दावा केला आहे. त्याचबरोबर काँग्रेस दुसऱ्या क्रमांकावर आणि जेडीएस तिसऱ्या क्रमांकावर असेल.

jalgaonsandesh

jalgaonsandesh