न्यायालयाचा निकाल फडणवीस यांना माहिती असावा, म्हणून ते ‘मी पुन्हा येईन’ असे म्हणतात…शरद पवार यांचे टिकास्त्र

बंडखोर सोळा आमदारांच्या अपात्रतेबाबत न्यायालयाचा लवकरच निर्णय येणार आहे. मात्र, तो काय असेल हे मी सांगू शकत नाही. बहुतेक तो निर्णय फडणवीस यांना माहिती असावा. त्यामुळेच ते मी पुन्हा येईन असं म्हणत असावेत, अशी मिश्किल टीका राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी करत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर निशाणा साधला.पंढरपूर येथे श्री विठ्ठल सहकारी साखर कारखान्यात आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते.

देशात सर्वात जास्त राज्यांमध्ये बिगर भाजप पक्षाचे सरकार आहे. कर्नाटकातही काँग्रेसची सत्ता येणार असल्याचा दावा त्यांनी केला. यापुढे आगामी निवडणुकांमध्ये विरोधी पक्षाची एकजूट करून भाजपसमोर सक्षम पर्याय दिला जाईल. कर्नाटकात होणाऱ्या प्रत्येक निवडणुकीत काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस आणि भाजपने महाराष्ट्र एकीकरण समितीला पाठिंबा दिला आहे. मात्र, यावेळी फडणवीस तेथे विरोधात प्रचाराला गेले असल्याचे शरद पवार यांनी स्पष्ट केले. सरकारच्या प्रकल्पाचे स्वागत व्हावे. मात्र, स्थानिकांना विचारात घेऊन असे प्रकल्प उभे राहावेत. राष्ट्रवादी काँग्रेसचा बारसूचा रिफायनरीला विरोध असल्याचे यावेळी त्यांनी जाहीर केले. सरकारने पोलीस बळाचा वापर करण्यापेक्षा चर्चेतून मार्ग काढावा, असा सल्लाही त्यांनी दिला.

शरद पवार यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या राष्ट्रीय अध्यक्षपदाचा राजीनामा मागे घेऊ नये, यासाठी भाजपच्या अनेक लोकांनी देव पाण्यात ठेवले होते. राजीनामा नाट्यानंतर महाविकास आघाडीची वज्रमूठ सैल झाल्याची टीका भाजपकडून होत होती. मात्र, आता पुन्हा काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) महाविकास आघाडी म्हणून कामाला लागणार असल्याचे पवारांनी जाहीर केले. शिंदे-फडणवीस सरकारच्या विरोधात राज्यात असंतोष आहे. त्यामुळे राज्यातील जनतेला आता बदल पाहिजे आहे, असेही त्यांनी सांगितले.

jalgaonsandesh

jalgaonsandesh