सचिनचं पोरगं मुंबईच्या संघात! अर्जुन तेंडुलकरचे IPL मध्ये पदार्पण, वानखेडेवर केकेआरशी भीडणार

इंडियन प्रीमियर लीगचा 16हा हंगाम सुरू असून एकाचढ एक सामने पाहायला मिळत आहे. अनेक नवखे खेळाडूही भाव खाऊन जात आहेत. अशातच गेल्या दोन हंगामापासून बेंचवर बसणारा अर्जुन तेंडुलकर मैदानात कधी उतरतो याची प्रतिक्षा क्रीडा चाहत्यांना होती. ही प्रतिक्षा संपली असून आज वानखेडेवर कोलकाता नाईट रायडर्स विरुद्ध होत असलेल्या लढतीत अर्जुनला अंतिम 11 खेळाडूंमध्ये स्थान मिळाले आहे.

मास्टर ब्लास्ट सचिन तेंडुलकर याचा मुलगा अर्जुन तेंडुलकर हा मुंबई इंडियन्सच्या ताफ्यात आहे. गेल्या दोन सामन्यांमध्ये त्याच्या नावाचा सबस्टिट्यूटच्या यादीत देखील समावेश करण्यात आला होता. मात्र या दोन्ही सामन्यांमध्ये त्याला इम्पॅक्ट प्लेअर म्हणून खेळवण्यात आले नाही. मात्र आज होणाऱ्या लढतीत त्याला थेट अंतिम 11 खेळाडूंमध्ये स्थान मिळाले आहे.

अर्जुन तेंडुलकर हा अष्टपैलू खेळाडू आहे. तो डाव्या हाताने फलंदाजी आणि गोलंदाजी करतो. अर्जुनला अद्याप प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये एक वर्षही पूर्ण झालेले नाही. त्याने सात प्रथम श्रेणी सामन्यांमध्ये 12 विकेट घेतल्या आहेत. तसेच 223 धावा केल्या असून त्याची सर्वोच्च धावसंख्या 120 आहे. लिस्ट ए मध्ये अर्जुनच्या नावावर आठ विकेट्स आहेत. फलंदाजीमध्ये त्याने आतापर्यंत केवळ 25 धावा केल्या आहेत. टी-20 मध्ये अर्जुनने नऊ सामने खेळले असून त्यात त्याने 12 विकेट घेतल्या आहेत. यासह 20 धावाही केल्या आहेत.

रोहितला आराम, सूर्या कर्णधार

दरम्यान, केकेआर विरुद्ध होणाऱ्या लढतीत मुंबईचा नियमित कर्णधार रोहित शर्मा खेळणार नाही. रोहितला या लढतीत विश्रांती देण्यात आली असून त्याच्या अनुपस्थितीत सूर्यकुमार यादव मुंबईचे कर्णधारपद भूषवताना दिसेल.

केकेआरविरुद्ध मुंबईचा संघ

ईशान किशन, कॅमरून ग्रिन, टिलक वर्मा, सूर्यकुमार यादव (कर्णधार), टीम डेव्हिड, नेहला वाढेरा, अर्जुन तेंडुलकर, ऋतिक शौकीन, पियूष चावला, डुआन जानसेन, राईल मेरिडीथ.