फडणवीस न्यायालयात हजर; गुन्ह्याची माहिती लपविल्याचा आरोप

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस शनिवारी प्रथम श्रेणी न्याय दंडाधिकारी न्यायालयापुढे उपस्थित झाले. निवडणूक शपथपत्रात गुन्ह्याची माहिती लपविल्याचा आरोप त्यांच्यावर आहे.

फडणवीस यांनी २०१४ साली झालेल्या विधानसभा निवडणुकांसाठी दाखल केलेल्या शपथपत्रात दोन गुन्ह्याची माहिती लपवली, असा आरोप ईडी प्रकरणातील आरोपी ॲड. सतीश उके यांचा आहे.

या प्रकरणात फडणवीस यांच्यावर गुन्हा दाखल करून खटला चालविण्यात यावा, अशी तक्रार त्यांनी प्रथम श्रेणी न्याय दंडाधिकारी न्यायालयापुढे केली होती. हे प्रकरण सर्वोच्च न्यायालयापर्यंत गेले. सर्वोच्च न्यायालयाने या प्रकरणी खटला चालविण्यात यावा, असे आदेश दिले. त्यानंतर प्रथम श्रेणी न्यायदंडाधिकारी न्यायालयात या प्रकरणी खटला सुरू झाला.

या तक्रारीवरील गेल्या सुनावणी दरम्यान उके यांच्या बाजूने युक्तीवादाची तसेच साक्षी पुरावे नोंदविण्याची प्रक्रिया पूर्ण झाली. यानंतर कायदेशीर प्रक्रियेनुसार आरोपीला न्यायालयात बयानासाठी उपस्थित राहावे लागते. त्यानुसार फडणवीस प्रथम श्रेणी न्यायदंडाधिकारी व्ही. ए. देशमुख यांच्यासमक्ष उपस्थित झाले.

आता या प्रकरणाची पुढील सुनावणी सहा मे रोजी होईल. या दिवशी फडणवीस यांच्याकडून या प्रकरणात काही साक्षी पुरावे नोंदवायचे असतील तर त्याची माहिती न्यायालयाला दिली जाणार आहे. फडणवीस यांनी शपथपत्रात ज्या गुन्ह्यांनी माहिती लपविली त्या दोन्ही गुन्ह्यांतून त्यांची मुक्तता झाली आहे.

jalgaonsandesh

jalgaonsandesh