अनोखं अभिवादन! लातूरात साकारलं वह्यातून बाबासाहेबांचे पोर्ट्रेट; वर्ल्ड रेकॉर्ड इंडियामध्ये नोंद

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची 132 जयंती देशभरात उत्साहात साजरी केली जातेय. यानिमित्त लातूरचे खासदार सुधाकर शृंगारे यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे भारतातील पहिले मोझाक कलेतून वह्यापासून पोर्ट्रेट तयार करण्यात आले आहे.

मोझाक कलेपासून बनविलेल्या हे भारतातील पहिलेच रेकॉर्ड असल्याने लातूरकरांसाठी ही एक आनंदाची पर्वणीच आहे.

डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचे 100 बाय 110 फूट आकाराचे 11 हजार स्क्वेअर फुट आकारामध्ये अठरा हजार वह्यांचा वापर करून हे पोर्ट्रेट बनवले आहे. देशातील मोझाक कलेचे कलाकार चेतन राऊत यांच्यासह विविध क्षेत्रातील 18 व्यक्तींनी तीन दिवस आणि तीन रात्र मेहनत करून हे पोट्रेट साकारला आहे.

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती संपन्न झाल्यानंतर शासकीय शाळेतील विद्यार्थ्यांना या अठरा हजार वह्यांचे वाटप केलं जाणार आहे. विद्यार्थ्यांमध्ये शिक्षणाचा प्रसार व्हावा ही सामाजिक बांधिलकी जपत लातूरचे खासदार सुधाकर शृंगारे यांनी या अठरा हजार वह्या विद्यार्थ्यात वाटप करणार असल्याचा मानस व्यक्त केला आहे.

डॉ.बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त मुंबईत बेस्टची विशेष व्यवस्था

भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची शुक्रवारी 14 एप्रिल रोजी जयंती आहे. यानिमित्ताने मुंबईतील चैत्यभूमी परिसरात देशभरातून आणि विदेशातून देखील बाबासाहेबांचे अनुयायी मोठ्या संख्येने येतात. ही बाब लक्षात घेऊन बेस्टकडून विशेष व्यवस्था करण्यात आली आहे.

डॉ.बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त बेस्टकडून अधिकच्या बसेसची सोय करण्यात आली आहे. आंबेडकर जयंतीला होणारी गर्दी लक्षात घेता बेस्टकडून प्रवाशांची विशेष काळजी घेतली जाणार आहे. यासाठी दादर स्टेशनपासून ते चैत्यभूमीपर्यंत अधिकच्या बसेस सोडण्यात येणार आहे.