“तिने काय-काय लफडी केली.” सुषमा अंधारेबाबत केलेल्या विधानावर शिरसाटांचं स्पष्टीकरण; म्हणाले.

मुंबई – शिवसेना ( शिंदे गट ) आमदार संजय शिरसाट यांनी अलीकडेच एका कार्यक्रमात ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे यांच्यावर टीका केली होती. ‘ती बाई म्हणते सगळेच माझे भाऊ आहेत. सत्तार, भुमरे माझे भाऊ आहेत.

पण, तिने काय-काय लफडी केली आहे, हे तिलाच माहीत,’ असं विधान शिरसाट यांनी केलं होतं. त्यांच्या वक्तव्यानंतर संतप्त प्रतिक्रिया व्यक्त होत असून, अंधारे यांनी महिला आयोगाकडे तक्रार दाखल करणार असल्याचं सांगितलं आहे. यावर आता शिरसाट यांनी स्पष्टीकरण दिलं आहे.

“मी काय चुकीचं बोललो आहे? सुषमा अंधारेंना ठाकरे गटात प्रवेश करण्यापूर्वी माझ्या घरी बोलवून बहीण म्हणून साडीचोळी दिली आहे. हे नातं जपणारे आम्ही लोक आहोत. मग, तुम्ही तुमच्या भाषणात ‘संज्या’, ‘घोडा’ म्हणणार हे तुमच्या संस्कृतीला चांगलं वाटतं? तुम्हाला तो अधिकार दिला आहे का?,” असं शिरसाट यांनी ‘टीव्ही ९’ मराठीशी बोलताना सांगितलं.

सुषमा अंधारेंनी महिला आयोगाकडे तक्रार करणार असल्याचं म्हटलं आहे. याबद्दल विचारलं असता शिरसाट म्हणाले, “निश्चित त्यांनी तक्रार करावी. चौकशी झालीच पाहिजे. पण, काय चुकीचं बोललो, हे तरी सांगा. संजय राऊत तर गळ्यात पाट्या घेऊन कामाठीपुरात बसवण्यासाठी चालले होते. त्यांच्याविरोधात महिला आघाडीने निदर्शने केली नाहीत.”

तेव्हा सभेत नेमकं काय म्हणाला होता? असं विचारला असता शिरसाटांनी सांगितलं, “संदीपान भुमरे आणि अब्दुल सत्तार यांना म्हणालो, तुम्ही काय लफडे केलीत. त्यामुळे अंधारे इकडे सभा घेत आहेत. यात चुकीचं काय आहे. आमच्यावर संस्कार आहेत. ज्यांना शिवसेना कळाली नाही, ते हिंदुत्वावर बोलतात. काही लोक संस्कारावर बोलून, त्या शब्दाचा अपमान करत आहेत.”

याप्रकरणात पोलिसांनी कारवाई करावी, नाहीतर न्यायालयात जाऊ, असा इशारा राष्ट्रवादीच्या नेत्या रूपाली पाटील यांनी दिला. यावर विचारल्यावर शिरसाट म्हणाले, “असेच चांगली काम करावीत. तुम्ही प्रसिद्धीसाठी कोणत्या स्थराला जात आहात. तुम्हाला तुमची पातळी कळत आहे का? मला ‘संज्या’, ‘घोडा’ म्हटलं, माझ्या बायको, मुलं, आई-वडिल आणि मित्रांना काय वाटलं असेल,” असा सवाल शिरसाट यांनी उपस्थित केला आहे.

jalgaonsandesh

jalgaonsandesh