‘मोदी म्हणजेच भ्रष्टाचार’, राहुल गांधींवरील कारवाईनंतर भाजपच्या महिला नेत्याचे ट्वीट व्हायरल

दिल्ली – मोदी  या आडनावाविषयी आक्षेपार्ह टिप्पणी केल्याप्रकरणी दाखल करण्यात आलेल्या मानहानीच्या खटल्यात दोषी ठरल्यानंतर राहुल गांधी यांना सुरत सत्र न्यायालयाने 2 वर्षांची शिक्षा सुनावली होती. त्यानंतर राहुल गांधी यांच्यावर लोकसभा अध्यक्षांकडून अपात्रतेची कारवाई करण्यात आली. राहुल गांधी यांचे संसद सदस्यत्व रद्द करण्यात आले.

राहुल गांधी यांची खासदारकी रद्द करण्यात आल्याने देशातील राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. काँग्रेसकडून देशभरात आंदोलन सुरू असून याचा भारतीय जनता पक्षही प्रत्युत्तर देत आहे. दोन्हीकडून आरोप-प्रत्यारोपाच्या फैरी झडत असताना भाजप नेत्या खुशबू सुंदर यांचे एक ट्वीट वेगाने व्हायरल होत आहे. याचाच आधार घेत काँग्रेसने भाजपवर निशाणा साधला आहे.

खुशबू सुंदर या सध्या भाजपमध्ये कार्यरत असून राष्ट्रीय महिला आयोगाच्या सदस्य आहेत. मात्र भाजप प्रवेशापूर्वी त्या काँग्रेसमध्ये होत्या. 2018मध्ये काँग्रेसमध्ये असताना त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर आडनावावरून टीका केली होती. राहुल गांधी यांच्यावरील कारवाईनंतर काँग्रेसने या ट्वीटचा आधार घेत त्यांच्यावर कारवाई करणार का? असा सवाल केला आहे.

काँग्रेसचे ज्येष्ठ नेते दिग्विजय सिंह यांच्यासह अनेक बड्या नेत्यांनी खुशबू सुंदर यांचे हे ट्वीट शेअर करत भाजप यावर कारवाई करणार का असा प्रश्न केला आहे. ‘मोदीजी आता तुम्ही खुशबू सुंदर यांच्यावरही तुमच्या मोदी नावाच्या एखाद्या शिष्याकडून मानहानीचा खटला दाखल करणार का? आता तर त्या भाजपच्या सदस्य आहेत’, असे ट्वीट दिग्विजय सिंह यांनी केले.

काय आहे ट्वीट?

खुशबू सुंदर यांनी 2018 मध्ये काँग्रेसमध्ये मोदींच्या आडनावावरून टीका केली होती. ‘इथे मोदी, तिथे मोदी, जिकडे बघावे तिकडे मोदी, पण मोदी म्हणजे नेमकं काय? प्रत्येक मोदी नावाच्या पूर्वी भ्रष्टाचार शब्द लिहिला जातो. मोदी म्हणजेच भ्रष्टाचार. चला मोदीचा अर्थ बदलून भ्रष्टाचार करूया. हेच योग्य राहील. निरव, ललित, नमो = भ्रष्टाचार’, असे ट्वीट खुशबू सुंदर यांनी केले होते.