भादली, पाळधी बुद्रुक, पिंप्री येथे ‘शादीखाना’ उभारणार! : पालकमंत्री पाटील

जळगाव – राज्याच्या अल्पसंख्याक विकास खात्यातर्फे शहरी आणि ग्रामीण भागातील अल्पसंख्याक बहुल भागात मुलभूत, पायाभूत सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी, जीवनमानाचा दर्जा उंचाविण्यासाठी विविध कामांना मंजुरी मिळते.

या अनुषंगाने जळगाव ग्रामीण मतदारसंघात पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्याकडे मुस्लिम बांधवांनी केलेल्या मागणीनुसार त्यांनी शादीखाना बांधकाम मंजुरीसाठी पाठपुरावा केला होता.

ग्रामीण भागातील तीन कामांसाठी ७५ लाख रुपयांच्या निधीला मंजुरी मिळाली आहे. याबाबत शासनाच्या अल्पसंख्याक विभागाने निर्णय जारी केला आहे.

जळगाव तालुक्यातील भादली बुद्रुक येथे शादीखाना बांधकामांसाठी ३० लाख, धरणगाव तालुक्यातील पाळधी बुद्रुक येथे शादीखाना बांधकामांसाठी ३० लाख, पिंप्री येथे शादीखाना बांधकामांसाठी १५ लाख, असे एकूण ७५ लाख निधीतून शादीखाने बांधण्यात येणार आहेत. यामुळे मुस्लिम समाजबांधवांसाठी लग्नकार्य व इतर अनुषंगिक कार्यासाठी याचा उपयोग होणार आहे.

“शासनाच्या विविध खात्यांच्या माध्यमातून समाजातील सर्व स्तरांसाठी विकासकामे मंजूर करण्याला आमचे प्राधान्य आहे.

अल्पसंख्याक विकास खात्याच्या माध्यमातून जिल्ह्यातील शहरी व ग्रामीण भागाला कोट्यावधींचा निधी मिळाला आहे. आगामी काळात जिल्ह्यातील अन्य तालुक्यांसाठीही निधी मिळविण्याचे प्रयत्न सुरू आहेत.”- गुलाबराव पाटील, पालकमंत्री