‘ते आमचे महादेव’, ठाकरे गटाच्या आमदाराकडून देवेंद्र फडणवीस यांना थेट देवाची उपमा

मुबई : शिवसेना ठाकरे गटाचे आमदार नितीन देशमुख यांनी आज सकाळपासून आपल्या मतदारसंघाच्या पाणी प्रश्नावरुन आंदोलन पुकारलेलं.

नितीन देशमुख यांनी विधानभवनातील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याजवळ मतदारसंघातील पाणी प्रश्नावरुन आंदोलन सुरु केलेलं. गेल्या अनेक तासांपासून त्यांचं आंदोलन सुरु होतं. त्यांच्या आंदोलनाची दखल अखेर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना घ्यावी लागली आहे. महाविकास आघाडीच्या नेत्यांनी देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली. यावेळी देवेंद्र फडणवीस यांनी पाणी प्रश्नावर मार्ग काढण्याचं आश्वासन दिलं. त्यानंतर नितीन देशमुख यांनी आपलं उपोषण मागे घेतलं. नितीन देशमुख यांनी आंदोलनादरम्यान आज ‘टीव्ही 9 मराठी’ला प्रतिक्रिया दिली. यावेळी त्यांनी फडणवीस यांना महादेवाची उपमा दिली.

‘त्यांचा अभिषेक करू’

“देवेंद्र फडणवीस यांना मी महादेव बोलतो. ते आमच्या जिल्ह्याचे पालकमंत्री आहेत. पण त्यांनी तिथे येऊन पहावं की खाऱ्या पाण्यातलं आयुष्य कसं आहे? महिला आपल्या बाळांना खारं पाणी कशा पाजत आहेत, त्यांनी आमच्या व्यथा समजून घेतल्या नाहीत. त्यामुळे सकाळपासून माझे आंदोलन सुरू आहे”, अशी प्रतिक्रिया नितीन देशमुख यांनी दिली. “दोन दिवसांमध्ये जर आमच्या मागण्या पूर्ण झाल्या नाहीत तर आम्ही देवेंद्र फडणवीस नागपूरला जिथे राहतात तिकडे याच पाण्याने त्यांचा अभिषेक करू. माझ्या प्रभागातल्या सगळ्या असंख्य शेकडो हजारो महिला तिथे जातील आणि आमच्या या महादेवाचे अभिषेक करतील”, असा इशारा नितीन देशमुख यांनी दिला.

“त्यांनी आमच्यावर ईडी लावावी. सीबीआय लावावं, आणखी वाटेल तेवढी कलमं लावावी. पण आमच्यासोबत हे असं राजकारण करू नये. गोरगरीब जनता आहे. त्यांना गोड्या पाण्याची गरज आहे. पण त्यांना जर पाणी मिळत नसेल तर त्यांचं आयुष्य धोक्यात आहे. आमच्या इथे लोकांच्या किडन्या खराब झाल्यात. काही जणांच्या किडन्या निकामी झाल्या आहेत. काही जणांना किडन्यांचे विकार झाले. मात्र तरी देखील या सरकारला पाझर फुटत नाही हे दुर्दैव आहे”, अशा भावना नितीन देशमुख यांनी व्यक्त केल्या.

“माझा जीव जरी गेला तरी देखील मी माझ्या भूमिकेवर ठाम आहे. माझे आंदोलन अशाच पद्धतीने सुरू राहील. कोणीही आलं काही दखल घेतली तरी देखील जोपर्यंत आमच्या मागण्या पूर्ण होत नाही आम्ही इथेच बसू मी इथेच बसणार आणि आंदोलन करणार”, अशी भूमिका नितीन देशमुखांनी मांडली.

ताजा खबरें