पाचवी-आठवीची बोर्ड परीक्षा उद्यापासून

परीक्षेची विद्यार्थ्यांना उत्सुकता, प्रथमच होणार परीक्षा

दहावी-बारावीच्या धर्तीवर पाचवी व आठवी या दोन इयत्तांच्या बोर्ड परीक्षा घेतल्या जाणार आहेत. सोमवार दि. 27 पासून परीक्षेची सुरुवात होणार असून सार्वजनिक शिक्षण खात्याने नियोजन केले आहे. प्रत्येक शाळेचा विद्यार्थी त्याच शाळेत परीक्षा देणार असला तरी पर्यवेक्षक म्हणून दुसऱ्या शाळांचे शिक्षक येणार आहेत. प्रथमच अशा प्रकारची परीक्षा होत असल्यामुळे विद्यार्थ्यांमध्ये उत्सुकता व धाकधूकही आहे.

शालेय विद्यार्थ्यांना दहावीमध्ये गेल्यानंतरच बोर्ड परीक्षा म्हणजे काय, ती कशी द्यावी, याची माहिती मिळते. यामुळे बरेच विद्यार्थी गोंधळून जातात. यामध्ये त्यांचे शैक्षणिक नुकसान होते. हे प्रकार टाळण्यासाठी शिक्षण विभागाच्यावतीने यावर्षीपासून पाचवी व आठवी या दोन इयत्तांच्या बोर्ड परीक्षा घेण्याचा निर्णय घेतला आहे. मध्यंतरी या परीक्षा होणार की नाही? याबाबत प्रश्नचिन्ह होते. परंतु उच्च न्यायालयाने परीक्षा घ्या, असे सांगितल्यानंतर 27 मार्चपासून दिलेल्या वेळापत्रकाप्रमाणे परीक्षा होणार आहेत.

अशी होणार परीक्षा

दहावीच्या बोर्ड परीक्षेप्रमाणेच प्रश्नपत्रिकेसाठी स्ट्राँगरूम तयार करण्यात आल्या आहेत. मुख्याध्यापक संबंधित स्ट्राँगरूममध्ये जाऊन सकाळच्या सत्रात पेपर आणणार असून पेपर संपल्यानंतर पुन्हा जमा करणार आहेत. पर्यवेक्षक म्हणून दुसऱ्या शाळांच्या शिक्षकांची गटशिक्षणाधिकारी कार्यालयामधून नेमणूक करण्यात आली आहे. मूल्यमापन करतानाही क्लस्टरस्तरावर प्रश्नपत्रिका तपासल्या जाणार आहेत. यामुळे विद्यार्थ्यांची गुणवत्ता समजण्यास मदत होणार आहे.

पहिल्यांदाच परीक्षा होणार असल्याने काहीशी गोंधळाची स्थिती होती. परंतु शिक्षण विभागाने मॉडेल प्रश्नपत्रिका जाहीर केल्यानंतर विद्यार्थ्यांच्या मनातील भीती काहीशी कमी झाली. त्याचबरोबर यावर्षी काठिण्य पातळी कमी ठेवण्याचा विचार केला गेला असल्याने विद्यार्थ्यांना बोर्ड परीक्षेची माहिती समजावी, हा हेतू शिक्षण विभागाने ठेवला आहे.

केंद्र प्रमुखांची तारेवरची कसरत

पाचवी आणि आठवी या दोन वर्गांच्या बोर्ड परीक्षा 27 मार्चपासून सुरू होणार आहेत. परंतु याच दरम्यान दहावीच्या परीक्षाही सुरू होणार आहेत. त्यामुळे बरेच शाळांचे मुख्याध्यापक दोन्ही परीक्षांना केंद्र प्रमुख असल्यामुळे सकाळच्या सत्रात दहावी तर दुपारच्या सत्रात पाचवी व आठवी या दोन्हीही जबाबदाऱ्या त्यांना पार पाडाव्या लागणार आहेत. त्यामुळे काही केंद्र प्रमुखांना तारेवरची कसरत करावी लागणार आहे.

ताजा खबरें