24 तासांत बंडोबांची ‘घरवापसी’ ; अजित पवारांच्या शपथविधीला उपस्थित राष्ट्रवादीचे आमदार शरद पवारांच्या गाडीत!

महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये रविवारी आणखी एक भूकंप झाला. अजित पवार यांनी शिंदे-फडणवीस सरकारमध्ये सहभागी होण्याचा निर्णय घेतला आणि राजभवनावर त्यांना उपमुख्यमंत्रीपदाची शपथही देण्यात आली. यासह राष्ट्रवादीच्या काही आमदारांनीही मंत्रिपदाची शपथ घेतली. अजित पवार यांना 30 ते 35 आमदारांचा पाठिंबा असल्याचा दावा त्यांच्यासोबत असणाऱ्या आमदारांकडून करण्यात येत आहे. या फुटीनंतर शरद पवार अॅक्शन मोडमध्ये आले असून पक्ष संघटन बळकट करण्यासाठी मैदानात उतरले आहेत.

अजित पवार यांनी विरोधी पक्षनेतेपदाचा राजीनाना देऊन उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. गेल्या पाच वर्षात तिसऱ्यांदा उपमुख्यमंत्री होण्याचा मान त्यांनी मिळवला. विरोधी पक्षनेताच फुटल्याने राष्ट्रवादी काँग्रेसला धक्का बसला. मात्र काल अजित पवार यांच्या शपथविधीला उपस्थित असणरे काही आमदार आज शरद पवार यांच्यासोबत दिसून आले. त्यामुळे शरद पवार यांनी सूत्र फिरवून आमदारांना पुन्हा आपल्यासोबत जोडण्यास सुरुवात केल्याचे दिसते.

विधानभवनामध्ये अजित पवारांसह राष्ट्रवादीचे नेते शपथ घेत असताना आमदार मकरंद पाटील, शशिकांत शिंदे आणि अतुल बेनके हे देखील उपस्थित होते. मात्र आज हे तिन्ही आमदार शरद पवार यांच्यासोबत दिसून आले. कराडमध्ये शरद पवार यांनी यशवंतराव चव्हाण यांच्या समाधीचे दर्शन घेतले, यावेळी हे आमदार पवारांसोबत दिसले. वाईचे आमदार मकरंद पाटील हे तर पवारांच्या गाडीतच होते.

जयंत पाटलांकडून कारवाईचा इशारा

दरम्यान, विधानसभा अध्यक्षांकडे रविवारी रात्री अपात्रतेच्या कारवाईसाठी याचिका पाठवली आहे. आम्ही त्यांना आमचे म्हणणे ऐकून घेण्याची विनंती केली. विधानसभेत राष्ट्रवादीचे 53 संख्याबळ आहे. यातील 9 जणांनी पक्षांतर केले असून बाकीचे सर्व आमच्यासोबत आहेत. त्यांना परत येण्याची संधी देऊ, पण जे परत येणार नाहीत त्यांच्यावर कारवाई करू, असा इशारा राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी दिला. ते माध्यमांशी संवाद साधत होते.

jalgaonsandesh

jalgaonsandesh