कार्तिकीनिमित्त विठ्ठल-रुक्मिणीचे २४ तास दर्शन सुरू; 10 लाख भाविक पंढरपुरात येण्याचा अंदाज

दक्षिण काशी म्हणून प्रसिद्ध असलेल्या पंढरीत कार्तिकी यात्रा एकादशीचा मुख्य सोहळा 23 नोव्हेंबर रोजी साजरा होत आहे. त्या अनुषंगाने जास्तीत जास्त भाविकांना श्री विठ्ठल-रुक्मिणीचे दर्शन घेता यावे, यासाठी गुरुवार (दि. 16) पासून ‘श्रीं’चे 24 तास दर्शन सुरू करण्यात आले आहे. यंदाच्या कार्तिकी यात्रेसाठी सुमारे 10 लाख भाविक पंढरपुरात येतील, असा प्रशासनाचा अंदाज आहे.

कार्तिकी एकादशीच्या पार्श्वभूमीवर प्रशासनाने जय्यत तयारी सुरू केली असून, येणार्‍या भाविकांना सोयी सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी ठोस पावले उचलली आहेत. त्यासाठी विशेष दर्शन मंडप तयार करण्यात आला आहे. दरम्यान, कार्तिकीनिमित्त भाविकांना 30नोव्हेंबरपर्यंत विठुरायाचे 24 तास दर्शन घेता येणे शक्य होणार आहे. त्याबाबतची माहिती प्रशासनाने दिली.

गुरुवार संध्याकाळी विविधत पूजा करून देवाच्या शयनगृहातील पलंग काढण्यात आला. यानंतर 24 मंदिर दर्शनासाठी श्री विठ्ठल व रुक्मिणी मंदिर खुले ठेवण्यात आले आहे. आषाढी यात्रा ही वर्षभरातील महत्त्वाच्या चार यात्रांपैकी मोठी व महत्त्वाची यात्रा आहे. तर कार्तिकी ही त्यानंतरची महत्त्वाची यात्रा भरते. कार्तिकीला 8 ते 10 लाख भाविक येतात. या भाविकांना श्री विठ्ठलाच्या पदस्पर्श दर्शनासाठी तासन्तास दर्शन रांगेत उभे राहावे लागते. या भाविकांना विश्रांतीसाठी दर्शन रांगेत बसण्यासाठी बाकांची व्यवस्था करण्यात आली आहे. कार्तिकी यात्रा यशस्वीपणे पार पाडण्यासाठी मंदिर समिती प्रयत्नशील आहे. याकरिता मंदिर समितीचे सहअध्यक्ष गहिनीनाथ औसेकर महाराज, कार्यकारी अधिकारी राजेंद्र शेळके, व्यवस्थापक बालाजी पुदलवाड यांच्यासह अधिकारी व कर्मचारी प्रयत्न करत आहेत.

दर्शन रांगेची उभारणी

कार्तिकी यात्रेला येणार्‍या भाविकांना पदस्पर्श दर्शन मिळावे, ही इच्छा असते. त्यामुळे दर्शन रांग पत्राशेडच्या पुढे गोपाळपूरपर्यंत जाते. सध्या गोपाळपूरपर्यंत दर्शन रांग उभारण्यात येत आहे. तर पत्राशेड येथे कायमस्वरूपी चार व तात्पुरते चार असे आठ दर्शन शेड उभारण्यात आले आहेत. वॉटरप्रूफ दर्शन रांगेत भाविकांना अत्याश्यक सेवासुविधा उपलब्ध करून देण्यात येत आहेत.

तीन वर्षांनंतर भरणार जनावरांचा बाजार

कार्तिकी यात्राकाळात पंढरपुरात भरणारा जनावरांचा बाजार हा राज्यभर प्रसिद्ध आहे. मात्र, पहिली दोन वर्षे कोरोना व नंतर एक वर्ष लम्पी आजारामुळे बाजार भरवण्यात आला नाही. मात्र, यावेळी भरवण्यात आला आहे. या बाजारात आलेला व्यापारी हा विठ्ठलाची जनावरे म्हणून खरेदी करतो. तर पंढरपूर व परिसरातील पशुपालक आपली जनावरे विक्रीकरिता बाजारात आणतात, यातून कोट्यवधी रुपयांची उलाढाल होते.

jalgaonsandesh

jalgaonsandesh