चोपडा – संततधारेमुळे शहरातील बोहरा गल्लीतील भांडे व हार्डवेअर असे दोन जीर्ण दुकाने मंगळवारी (ता. २७) मध्यरात्री कोसळली. यात २५ लाखांचे आर्थिक नुकसान झाले आहे.
मंगलदास किसनदास सोनवणे यांच्या मालकीचे जुने मातीचे दुकान संदीप मनीलाल कासार यांना भाड्याने दिले होते. त्या दुकानात संदीप कासार भांड्यांचा व्यवसाय करीत होते. ते दुकान सतत सुरू असलेल्या पावसामुळे मंगळवारी मध्यरात्री कोसळले. यात संदीप कासार यांच्या ८ ते ९ लाखांच्या भांड्यांचे नुकसान झाले आहे.
कासार यांच्या दुकानाला लागून असलेले लोडबेअरिंगचे संदेश सतीलाल जैन यांच्या मालकीचे दोन मजली हार्डवेअरचे दुकानही काही वेळाने कोसळले. यामुळे दुकानातील सात ते आठ लाख रुपयांच्या हार्डवेअरचे साहित्याचे नुकसान झाले, तर १० लाख रुपयांच्या लोडबेअरिंगच्या दुकानाचेही नुकसान झाले आहे. एकंदरित दोन्ही दुकानांचे २५ लाखांचे नुकसान झाले आहे. सुदैवाने ही घटना रात्री घडली, म्हणून कोणतीही जीवितहानी झाली नाही. घटनेतील नुकसानीचा पंचनामा शहर तलाठी किरण महाजन यांनी केला आहे.