कार्यमुक्ती, पदोन्नती लाभासाठी लिपिकाने मागितले 2 लाख! जळगावात अटक; घरी सापडली 8 लाखांची बेनामी रोकड

जळगाव – कार्यमुक्त करून पदोन्नतीचे सर्व लाभ मिळवून देण्यासाठी जळगाव जिल्हा परिषदेच्या सामान्य प्रशासन विभागातील वरिष्ठ लिपिक नरेंद्र किशोर खाचणे (५२) याला १ लाख ८० हजारांची लाच घेताना लाचलूचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने बुधवारी (ता.२१) रात्री साडेदहाला अटक केली.

यानंतर त्याच्या लोकेशनगर येथील घराची झडती घेतली असता त्यात ८ लाख १५ हजार ४१७ रुपयांची बेनामी रोकड मिळून आली आहे. संशयिताला आज जिल्‍हा न्यायालयात हजर केले असतान दोन दिवसांची पोलिस कोठडी देण्यात आली आहे.

तक्रारदार जिल्‍ हापरिषदेत कार्यरत असून सावखेडा सिम (ता. यावल) प्राथमिक आरोग्य केंद्रात शिपाई आहेत. त्यांची स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक पदावर रावेर पंचायत समिती येथे बढतीवर बदली झाली होती. बदलीच्या ठिकाणी रूजू होण्याकरीता कार्यमुक्त करणे तसेच पदोन्नतीचे सर्व लाभ मिळून देण्यासाठी नरेंद्र खाचणे याने २ लाख रुपयांची मागणी केली होती.

तक्रारदार नुकतेच आजारपणातून बाहेर निघाले असून त्यांच्याकडे तजवीज होत नसल्याने त्यांनी यापूर्वी वीस हजारांची रक्कम नरेंद्र खाचणे यांना दिली होती. उर्वरीत १लाख ८० हजारांसाठी लिपिक खाचणे यांच्याकडून तगादा लावला जात होता. ‘आपल्या मदतीशिवाय तुम्हाला कुठलेही लाभ मिळणार नाही’ असेही तो धमकावत होता.

त्यामुळे तक्रारदाराने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे धाव घेतली. खातरजमा केल्यानंतर पोलिस निरीक्षक अमोल वालझाडे, एन. एन. जाधव यांच्या मार्गदर्शनानुसार उपनिरीक्षक दिनेशसिंग पाटील, सुरेश पाटील, रवींद्र घुगे, शैला धनगर, बाळू मराठे, सुनील वानखेडे, राकेश दुसाने, प्रणेश ठाकूर, किशोर महाजन, प्रदीप पोळ, सचिन चाटे, अमोल सूर्यवंशी यांच्या पथकाने शहरातील कालिका माता मंदिर चौक ते हॉटेल जान्हवीच्या परिसरात सापळा रचला.

संशयित नरेंद्र खाचणे याने रात्री तब्बल दीड तास तक्रारदारास इकडून तिकडे, तिकडून इकडे असा गुंगारा देत सुरक्षेची खात्री करून घेतल्यानंतर एक बिअरबारच्या बाहेर बोलवत रात्री साडेदहाला १ लाख ८० हजारांची रोकड घेतली. पैसे हातात घेताच दबा धरुन असलेल्या पथकाने नरेंद्र खाचणे याच्यावर झडप मारून त्याला अटक केली. शनिपेठ पोलिस ठाण्यात रात्री दीडच्या सुमारास गुन्ह्याची नोंद करण्यात आली.

घरात आढळली बेनामी मालमत्ता

लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने नरेंद्र खाचणे याला अटक करुन गुन्हा दाखल केल्यावर लगेच तो राहत असलेल्या अयोध्यानगरातील घरावर छापा टाकला. घरझडतीत ८ लाख १५ हजार ४१७ रूपयांची बेनामी रक्कम आढळून आली आहे.

संशयिताला न्यायालयात हजर करताना ही बाब सरकारपक्षाने आणि तपासाधिकाऱ्यांनी न्यायालयाच्या निदर्शनास आणून देत अधिक तपासासाठी पोलिस कोठडीची मागणी केली. न्या. जे. जे. मोहिते यांच्या न्यायालयाने त्याला दोन दिवसांची कोठडी सुनावली असून सरकारपक्षातर्फे जिल्‍हा सरकारी अभियोक्ता ॲड. सुरेंद्र काबरा यांनी कामकाज पाहिले.

ताजा खबरें