शिवसेनेच्या (उद्धव बाळासाहेब ठाकरे) शिष्टमंडळाने आज विधानसभेचे उपाध्यक्ष नरहरी झिरवळ यांची भेट घेतली. 16 आमदारांच्या अपात्रतेचा निर्णय लवकरात लवकर घ्यावा यासाठी अशी मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली. सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाची एक प्रतही झिरवळ यांना देण्यात आली. यावेळी आमदार आणि प्रतोद सुनील प्रभू, अनिल परब, सचिन अहीर, सुनील राऊत, मनिषा कायंदे आदी उपस्थित होते.
झिरवळ यांची भेट घेतल्यानंतर शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) आमदार आणि प्रतोद सुनील प्रभू यांनी माध्यमांशी संवाद साधला. सर्वोच्च न्यायालयाच्या 16 आमदारांच्या अपात्रतेबाबत निर्णय देताना विधानसभा अध्यक्षांनी लवकरात लवकर यावर सुनावणी घ्यावी असे म्हटले आहे. आज नरहरी झिरवळ यांची भेट घेऊन त्यांना सर्वोच्च न्यायालयाच्या निकालाची प्रत आणि अध्यक्षांचे पत्र त्यांच्याकडे देण्यात आले. विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर मुंबईत नसल्याने हे निवेदन झिरवळ यांच्याकडे देण्यात आले. सर्वोच्च न्यायालयाने घालून दिलेल्या चौकटीनुसार लवकरात लवकर याबाबत निर्णय घ्यावा अशी विनंती आम्ही केल्याचे सुनील प्रभू म्हणाले.
विधानसभा उपाध्यक्षांकडे देण्यात आलेल्या पत्रामध्ये सर्वोच्च न्यायालयाच्या जजमेंटचा उल्लेख आहे. या जजमेंटमध्ये सर्वोच्च न्यायालयाने लवकरात लवकर सुनावणी घेऊन 16 आमदारांच्या अपात्रतेबाबत निर्णय घेण्याचे निर्देश दिले आहे. आम्ही आमच्या पक्षाच्या वतीने हे जजमेंट आणि विनंती असे पत्र झिरवळ यांच्याकडे दिले आहे. मणिपूरमध्ये अशाच एका प्रकरणाचा निर्णय झटपट झाला होता, त्यामुळे आम्हीही लवकरात लवकर निर्णय घेण्याची विनंती लोकशाही आणि संविधानानुसार केली आहे. तो आमचा अधिकार आहे, असेही ते प्रभू म्हणाले.