दहावी, बारावीतील अनुसूचित जातीच्या विद्यार्थ्यांची निघणार गुणवत्ता यादी

राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाकडून दहावी व बारावी परीक्षेला बसलेल्या अनुसूचित जातीच्या विद्यार्थ्यांची गुणवत्ता यादी जाहीर केली जाणार आहे. राज्य सरकारने अनुसूचित जमाती (एसटी) प्रवर्गातील गुणवंत विद्यार्थ्यांना बक्षिस योजना जाहीर केली आहे. त्यामुळे राज्य मंडळासह विभागीय मंडळे तसेच पेंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळालाही (सीबीएसई) गुणवत्ता यादी काढावी लागणार आहे.

आदिवासी विकास विभागाअंतर्गत राज्यात कार्यरत असलेल्या शासकीय आश्रमशाळा, अनुदानित आश्रमशाळा, नामांकीत शाळा, सैनिकी शाळा, एकलव्य मॉडेल रेसिडेंशियल स्कुलमधील दहावी व बारावीमध्ये शिक्षण घेत असलेल्या अनुसूचित जमातीच्या विद्यार्थ्यांसाठी ही योजना सुरू करण्यात आली आहे. दोन्ही मंडळांच्या गुणवत्ता यादीत प्राविण्यासह गुण मिळवून राज्यात प्रथम येणारी पाच मुले व पाच मुली तसेच राज्यातील नऊ विभागीय मंडळांमध्ये प्रथम येणारी प्रत्येकी तीन मुले व तीन मुलींना प्रोत्साहनपर बक्षिस दिले जाणार आहे.

राज्य शासनाकडून या योजनेचा जीआर काढण्यात आला आहे. बारावीच्या कला, वाणिज्य व विज्ञान शाखेनुसार प्रत्येक पाच मुला व मुलींची गुणवत्ता यादीही काढावी लागेल. या विद्यार्थ्यांना पहिला ते पाचव्या क्रमांकानुसार अनुक्रमे 30 हजार, 25 हजार, 20 हजार, 15 हजार आणि 10 हजार बक्षिसे दिली जाणार आहेत.

राज्यातील नऊ विभागीय शिक्षण मंडळांनाही दहावी व बारावीची स्वतंत्र गुणवत्ता यादी काढावी लागणार आहे. त्यातून दहावीची पहिली तीन मुले व पहिल्या तीन मुली तर बारावीच्या तिन्ही शाखांनुसार प्रत्येकी तीन मुले व मुली अशा एकुण 34 विद्यार्थ्यांना बक्षिस दिले जाणार आहे. एकापेक्षा जास्त विद्यार्थ्यांना समान गुण असतील तर सर्वांना त्या क्रमांकाच्या बक्षिसाची रक्कम देण्यात यावी, असे राज्य सरकारने स्पष्ट केले आहे. योजनेची अंमलबजावणी 2022-23 या शैक्षणिक वर्षापासून होणार आहे.

jalgaonsandesh

jalgaonsandesh