सहावी ते आठवीसाठी 10 दिवस दप्तराविना शाळा; विद्यार्थ्यांना व्यावसायिक शिक्षणाचे धडे देणार

राष्ट्रीय शैक्षणिक धोरणात शालेय स्तरावरच व्यवसाय शिक्षणाला महत्त्व देण्यात आले आहे. त्यामुळे राज्याने तयार केलेल्या राज्य अभ्यासक्रम आराखडय़ाच्या मसुद्यातही सहावी ते आठवीच्या विद्यार्थ्यांना व्यवसाय शिक्षणाचे धडे दिले जाणार आहेत. त्यासाठी ‘दहा दिवस दप्तराविना शाळा’ या उपक्रमाचे आयोजन शाळेत करण्याची शिफारस मसुद्यात केली आहे. या दहा दिवसांत विद्यार्थ्यांना सुतारकाम, इलेक्ट्रिक काम, धातूकाम, बागकाम, पुंभारकाम व्यवसायांचे प्रशिक्षण दिले जाणार आहे.

हिंदुस्थानी ज्ञान प्रणालीअंतर्गत राज्याची संस्कृती, परंपरा, वारसा, प्राचीन आणि समकालीन ज्ञान, वेदकथा, गुरू-शिष्य परंपरा या घटकांची ओळख अभ्यासक्रमातून विद्यार्थ्यांना करू देण्याची सूचना मसुद्यात केली आहे. त्यानुसार भाषा विषयांच्या अभ्यासासाठी ‘प्राचीन ज्ञानवारसा जपूया-पाठांतर स्पर्धेचे आयोजन करूया’ यानुसार तिसरी ते पाचवीपर्यंत एक ते 25 मनाचे श्लोक, सहावी ते आठवीसाठी 26 ते 50 मनाचे श्लोक आणि नववी ते बारावीसाठी भगवद्गीतेतील बारावा अध्याय यांचे पाठांतर करण्याची स्पर्धा आयोजित करण्यास सुचविले आहे. त्याचप्रमाणे भगवद्गीतेतील ज्ञानयोग, आत्मज्ञानयोग, भक्तियोग, कर्मयोग यांची ओळख विद्यार्थ्यांना करून देण्यात यावी. देशातील प्राचीन ऋषींची दीनचर्या, आहार, ग्रंथसंपदा, जीवनविषयक दृष्टिकोन, ग्रंथसंपदा यांची ओळख तसेच थोर पुरुष, समाजसुधारक, सण व उत्सव, देशाविषयी अभिमान रुजविणे, तंत्रज्ञानाची माहिती, गड किल्ले माहिती विद्यार्थ्यांना देण्याची शिफारस आहे.

विद्यार्थ्यांना मनाचे श्लोक, भगवद्गीतेची ओळख

राज्य अभ्यासक्रम आराख्डय़ाच्या मसुद्यात हिंदुस्थानी ज्ञान प्रणालीवर भर देण्यात आला असून तिसरी ते आठवीच्या विद्यार्थ्यांसाठी मनाचे श्लोक पाठांतर स्पर्धा तर नववी ते बारावी पर्यंतच्या विद्यार्थ्यांसाठी भगवद्गीतेतीलद्बारावा अध्याय पाठ करण्याची स्पर्धा घेण्यात यावी, अशी शिफारस करण्यात आली आहे. तसेच हिंदुस्थानी मूल्यांची ओळख करून देण्यासाठी मनुस्मृतीतील श्लोकाचा वापर करण्यास सुचविले आहे.

विद्यार्थ्यांचा प्रवेश रद्द करण्याचा अधिकार

विद्यार्थ्यांचा शाळेतील प्रवेश रद्द करण्याची तरतूद मसुद्यात केली आहे. एखाद्या विद्यार्थ्याने गैरवर्तन केल्यास शाळेतील प्रवेश रद्द करणे, शाळेतून कायमची हकालपट्टी करणे किंवा कायमचा प्रवेश रद्द करणे असे टोकाचे निर्णय सुचवण्यात आले आहेत; मात्र त्यापूर्वी पालक आणि विद्यार्थ्यांचे समुपदेशन करण्यात यावे आणि विद्यार्थ्यांप्रति दयाळूपणा, क्षमाभावना असावी, असेही म्हटले आहे.

मसुद्यात सहावीपासून पुढे मराठी भाषेची सक्ती केलेली दिसत नाही. अकरावी-बारावीच्या गटात इंग्रजी विषय अनिवार्य नसला तरी कोणत्याही दोन भाषा निवडण्याची सूट विद्यार्थ्यांना आहे. यात मराठीची सक्ती केली आहे, असे स्पष्ट होत नाही.

ताजा खबरें