1 कोटी इलेक्ट्रिक वाहनांची होणार विक्री ; वाहन क्षेत्रात होणार मोठा बदल : नितीन गडकरी

भारत 2030 पर्यंत 1 कोटी इलेक्ट्रिक वाहनांच्या (EV) वार्षिक विक्रीचे उद्दिष्ट साध्य करण्यासाठी तयार आहे. यामुळे या क्षेत्रात सुमारे 5 कोटी रोजगार निर्माण होतील, असं केंद्रीय मंत्री नितीन गडकरी म्हणाले आहेत.

याशिवाय सरकारच्या वाहन पोर्टलचा हवाला देत त्यांनी सध्या भारतात 34.54 लाख ईव्हीच्या नोंदणी होत असल्याचं सांगितलं आहे.

सध्याची वाहने हायब्रीड आणि पूर्णपणे इलेक्ट्रिक वाहनांमध्ये बदलण्यासाठी सरकारने मान्यता दिल्याची घोषणाही गडकरींनी केली.

देशातील वाहनांच्या डेटानुसार, नोव्हेंबर 2023 मध्ये संपूर्ण भारतात इलेक्ट्रिक वाहनांची विक्री 1,52,610 युनिट्सवर पोहोचली. नोव्हेंबर 2022 मध्ये विकल्या गेलेल्या 1,21,598 युनिट्सवर वर्षभरात 26 टक्क्यांची वाढ नोंदवली गेली.

हा आकडा मे 2023 मध्ये प्राप्त झालेल्या 1,58,420 युनिट्सच्या विक्रमी मासिक विक्रीच्याही जवळ आला आहे. मे महिन्यात ईव्हीच्या विक्रीत वाढ होण्याचे कारण म्हणजे 1 जूनपासून सुरू होणार्‍या टू व्हीलर सेगमेंटमध्ये FAME अनुदानातील कपात करण्याचा निर्णय सरकारने घेतला. हा लाभ मिळावा म्हणून ग्राहकांनी मोठ्या प्रमाणात इलेक्ट्रिक वाहने खरेदी केले.

याव्यतिरिक्त दुचाकी, तीन चाकी, प्रवासी वाहने आणि व्यावसायिक वाहनांसह इलेक्ट्रिक वाहनांची एकूण विक्री 2023 पूर्वीच्या 11 महिन्यांत ऐतिहासिक 13,87,114 युनिट्सवर पोहोचली आहे. जे दरवर्षी या सेगमेंटला आणखी मजबूत करत आहे. 2022 मध्ये याच वेळेच्या तुलनेत 50 टक्क्यांची वार्षिक वाढ झाली होती. ज्यामध्ये जानेवारी ते नोव्हेंबर या कालावधीत 9,24,111 युनिट्सची विक्री नोंदवली गेली.